ताज्या घडामोडी

शिक्षण क्षेत्रातील आयडॉल अशोकरावजी चव्हाण साहेब..

रामु चव्हाण

वसमत/
भलेही शिक्षणाचा संबंध नोकरीशी नाही असे म्हणत असले तरी प्रचंड मेहनतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊनही जेव्हा काही तांत्रिक कारणामुळे आर्थिक अडचणीमुळे संधी न मिळाल्यामुळे अतिशय गुणवान हुशार मुलं जेव्हा या स्पर्धेतून बाहेर पडतात तेव्हा या शिक्षणाची निरर्थकता स्पष्टपणे अधोरेखित होते.पर्यायाने जे नोकरीपासून दुरावतात चांगल्या कामधंद्यापासून दुरावतात त्यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक बनतो. विशेषता अलीकडच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्राची प्रचंड शोकांतिका पाहायला मिळत आहे. तत्व मूल्य गुणवत्ता बांधिलकी निष्ठा प्रामाणिकपणा कालबाह्य बनत चालला आहे. गुणवत्तेचा व नोकरीचा अर्थार्थी संबंध राहिला नाही.असेल वशिला तर नोकरी मिळेल म्हशीला अशी अवस्था झाली आहे .पैशाच्या महापुरात नोकऱ्या अडकल्या आहेत. म्हणून आपला, जवळचा ,लांबचा, जातीचा, धर्माचा मतदारसंघातला ,भावी जावई अशा अनेक संदर्भाने नोकऱ्यांचा सौदा होत आहे. अगदी शिपायापासून ते प्राचार्यापर्यंत सर्रासपणे पैशांचे व्यवहार होऊन नोकऱ्या दिल्या जात आहेत. एकूणच काय तर शासनाची उदासीनता.शासनाचा शिक्षणाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन ,पंचवार्षिक योजनेतील अत्यंत कमी तरतूद, शिक्षणाचे होणारे खाजगीकरण, घसरत चाललेला शैक्षणिक दर्जा, शिक्षण सम्राटांची फौज, राज्यकर्त्यांची उदासीनता.. इत्यादीमुळे समाज घडवणारा शिक्षक ,राष्ट्राचा आधारस्तंभ असलेला शिक्षक ,राष्ट्राचा शिल्पकार असलेला शिक्षक,आज शिक्षण सेवक बनून याचना करत आहे.माजोरी नोकरशहा ,शातीर राज्यकर्ते व तथाकथित शिक्षणसम्राटामुळे शिक्षणाचे वाटोळे झाले आहे. शिक्षणातून शिस्त, समर्पण, संयम ,चारित्र्य, संस्कार कमी होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशाप्रकारे शिक्षण क्षेत्रातून साने गुरुजी नष्ट होत असताना दुसऱ्या बाजूला नाणे गुरुजी चा उदो उदो होत आहे कर्मवीर भाऊराव पाटलांचा शिक्षण विषयक विचार राज्य व देशांमध्ये सर्वत्र पायदळी तुडवला जात असताना राज्य व देशांमध्ये अनेक नकली शिक्षण सम्राटाचे पीक जोमाने फोफावत असताना कर्मवीर भाऊराव पाटलाचे खरे विचार आचार आणि शिकवण प्रत्यक्षात अमलात आणणारे अशोकरावजी चव्हाण हे खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातील एक आयडॉल आहेत असे म्हटले तर फारसे वावगे होणार नाही कारण शारदा भवन शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत कोणत्याही भरतीमध्ये कसलाही आर्थिक व्यवहार न करता अनेक गुणवंतांना गरजूंना त्यांनी संधी दिली व अनेकांचे जीवन बदलून टाकण्याचा प्रयत्न केला. म्हणून माननीय अशोकरावजी चव्हाण हे एक उमद नेतृत्व, कर्तबगार नेतृत्व, आपण सर्वांनी जाणीवपूर्वक जपले पाहिजे. जोपासले पाहिजे .कारण आदरणीय शंकररावजी चव्हाण हे जसे मराठवाड्याचे व महाराष्ट्राचे जलपुरुष म्हणून ओळखले जातात जलशंकर म्हणून ओळखले जातात, त्यांच्या जलसिंचन व पाटबंधारे विभागातील कार्यामुळे त्यांनी बांधलेल्या असंख्य धरणामुळे त्यांनी केलेल्या शेती विकासामुळे त्यांनी निर्माण केलेल्या विविध असामान्य कामगिरीमुळे, त्यांच्याच पायवाटेने पुढे पुढे जात असताना माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी शिक्षण क्षेत्रात नवीन आदर्श ,नवी पांयडे, नवीन आशा, नवीन जाणिवा निर्माण केल्या आहेत हे आपण नाकारू शकत नाही. माननीय शंकरावजींचा शैक्षणिक विचाराचा वारसा पुढे नेताना सर्व सोयीनीयुक्त अशी चार वरिष्ठ महाविद्यालय डी.फार्मसी महाविद्यालय बी. फार्मसी कॉलेज .डी.एड .कॉलेज बी.एड कॉलेज लॉ कॉलेज अशी अनेक शाळा आणि महाविद्यालये अशोकरावजीनी नांदेड व परिसरामध्ये विकसित केली आहेत.या विविध शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाहू फुले आंबेडकरांचा वैचारिक वारसा जपत शिक्षण तळागाळापर्यंत दिन दलितापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत .मागील चार दशकापासून शैक्षणिक विकासाची घोडदौड अखंडपणे सुरू आहे. शाळा महाविद्यालय, डी.एड कॉलेज बी.एड कॉलेज, लॉ कॉलेज, फार्मसी कॉलेज इत्यादीच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य त्यांनी घडवले आहे. शेकडो नाही तर हजारो लोकांना रोजगार निर्माण करून दिला आहे. अशोकरावजींच्या नेतृत्वामुळे व कर्तृत्वामुळे शेकडो कर्मचाऱ्याला नव्हे हजारो कर्मचाऱ्याला जन्माची भाकरी मिळू शकली. अनेकांच्या पिढ्या सुधारल्या .आजपर्यंत नौकर भरतीमध्ये अत्यंत पारदर्शीपणे गुणवंतांना संधी देताना कोणाचा एक रुपया संस्थेने घेतला नाही. महत्त्वाचं म्हणजे आज उच्च शिक्षणात पैशाचा महापूर वाहत असताना वरिष्ठ महाविद्यालयात किमान 60 लाख ते कमाल एक कोटीपर्यंत डोनेशन देणाऱ्यांची रांग दारात उभी असताना माननीय अशोकरावजींनी शेकडो लोकांना नोकरीवर घेतले, आताचे ताजे उदाहरण पहावयाचे झाल्यास अशोकरावच्या शारदा भवन शिक्षण संस्थेने 54 पूर्णवेळ प्राध्यापकांच्या जागा भरल्या, एकही पैशाचा आर्थिक व्यवहार तेथे झाला नाही. म्हणून मी अशोकरावजींना आदर्श संस्थाचालक मानतो. कारण सरासरी 60 लाख रुपये डोनेशन गृहीत धरले तर 32 कोटी चाळीस लाख रुपये देण्यासाठी असंख्य लोक रांगेत उभे असताना अशोकरावजींनी मात्र वडिलांचा वैचारिक वारसा जपत जपत व्यक्ती समाज व देशहिताचा विचार करताना दिन दलितांना सर्वसामान्यांना एकही रुपया न घेता प्राध्यापक म्हणून सेवेत घेतले. 54 लोकांना नोकऱ्या दिल्या. महाराष्ट्रात हे चित्र आज अत्यंत दुर्मिळ होत चालले आहे. नव्हे तर हाताच्या बोटावर मोजता येण्यासारख्या संस्थात शिल्लक राहिल्या आहेत. दुसऱ्या बाजूला अनेक शाळा महाविद्यालयात नोकर भरतीसाठी लाखो रुपये घेतले जातात. शिवाय वारंवार जयंती पुण्यतिथी वाढदिवस निवडणुका आंदोलन मोर्चा चळवळी टिकवण्यासाठी वारंवार पैसे मागितले जातात. पदोन्नती व कॅस CAS करण्यासाठी पन्नास हजार, एक लाख व दीड लाख असे स्लॅब पाडून पैसे वसूल केले जातात. नोकरी लागल्यापासून ते निवृत्तीची फाईल करण्यापर्यंत पैसे उकळे जातात. अशा हाराखिरीच्या काळात अशा हेराफेरीच्या काळात अशा अंदाधुंदीच्या काळात एकाच वेळी 54 प्राध्यापकांची भरती करून एकही रुपया न घेणारा संस्थाचालक माझ्यासाठी नक्कीच एक आयडॉल संस्थाचालक आहे असे म्हणावे वाटते. दुसऱ्या बाजूला अनेक नामांकित शिक्षण संस्थेत नव्याने सत्तेत आलेल्या लोकांनी ॲडव्हान्स बुकिंग पद्धतीचा अवलंब करून कोट्यावधीची माया जमवली आहे. या पार्श्वभूमीवर अशोकरावजी चव्हाण म्हणजे एक ध्येयवेढा शिक्षणप्रेमी खरा शिक्षण महर्षी म्हणावं लागेल. म्हणून म्हणतो एका अपवादामुळे अशोकरावजींना बदनाम केले जात असेल तर या शिक्षण क्षेत्रातील निस्पृह निस्वार्थी निष्कलंक त्यागाची समाजाला दखल घ्यावीच लागेल. कोट्यावधीवर पाणी सोडून शिक्षण तळागाळापर्यंत व दिनदलिता पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारा खरा शिक्षण महर्षी, कर्मयोगी म्हणून त्यांच्या कार्याचे कौतुक व्हायलाच हवे. महाराष्ट्रातील जनतेशी मातीशी व जनमानसाशी जोडलेला मासलीडर म्हणून करिष्माई नेता म्हणून दूरदृष्टी असलेला राजकारणी म्हणून लोकांनी पक्षाने व पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर कौतुकाची छाप मारायलाच हवी .अशी चांगली माणसे ,चांगले विचार ,चांगले नेतृत्व ,चांगल्या लोकांच्या पुढाकारातून जोपासले जावे. मजबूत व्हावे.तरच शिक्षण तळागाळापर्यंत दिन दलित्तापर्यंत वंचितापर्यंत पोहोचेल, म्हणून मी नम्रपणे म्हणेन अशोकराव आदर्श संस्थाचालक म्हणून कौतुक करावी अशी गोष्ट म्हणजे ते लोकसभेला जवळपास 65 हजार मतांनी पराभूत झाले, त्यांच्या विरोधातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक यशपाल भिंगे सरना जवळपास एक लाख 70 हजार मते पडली, म्हणजे प्राध्यापक भिंगे सरांनी एक लाख 70 हजार मते घेतल्यामुळे अशोकरावजी 65 हजार मतांनी पराभूत झाले, तरी प्राध्यापक यशपाल भिंगे यांची पत्नी अशोकरावजींच्या श्री शारदा भवन शिक्षण संस्थेमध्ये नोकरी करत आहेत , त्यांनी कधीही तिला त्रास दिला नाही किंवा तशी जाणीवही होऊ दिली नाही, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा म्हणावा लागेल. अशाच प्रकारे देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विरोधात बहुजन विकास आघाडी तर्फे त्यांच्याच महाविद्यालयातील अर्धापूर येथील एक प्राध्यापक सदाशिव भुयारे हे निवडणुकीला उभे टाकले, त्यांनी काँग्रेसच्या मताचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला ,तरीही त्या प्राध्यापकाला अशोकरावजी काहीच म्हणाले नाहीत .तात्पर्य प्रत्येकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करणारे अशोकरावजी हे प्रगल्भ व्यक्तिमत्त्व म्हणावे लागेल.अशोकरावजींच्या शिक्षण संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आतापर्यंतची एकूण संख्या दीड हजारापेक्षा अधिक असेल त्यांच्याकडून त्यांनी डोनेशन घ्यावयाचे ठरवले असते तर ते कदाचित अब्जाधीश झाले असते ,पण तसे केले नाही. कारण अशोकरावजी शंकरावजीप्रमाणेच व्यक्ती समाज व देश हिताला वाहून घेतात. शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा ध्यास आहे, म्हणून ते मला शिक्षण क्षेत्रातील आयडॉल वाटतात. अशा शिक्षणाक्षेत्रातील दृष्ट्या नेतृत्वामुळे अनेकांना केवळ गुणवत्तेच्या आधारे शिक्षण क्षेत्रामध्ये संधी मिळू शकली, म्हणून हा गुणवत्तेची उपासना करणारा ,गुणवत्तेची जोपासना करणारा ,व गुणवत्तेची कदर करणारा व्यक्ती समाजाने जपला पाहिजे .जोपासला पाहिजे.
प्रा. डॉ. शशिकांत कळमारे श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालय वसमत जिल्हा हिंगोली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!