आपला जिल्हाराजकीय

खा. हेमंत पाटील यांच्यावरील खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

रामु चव्हाण

वसमत /रामु चव्हाण

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी येथे घडलेल्या ३१ मृत्यूप्रकरणी भेट दिली. दरम्यान त्या ठिकाणी अनेक बाबी रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक यात शौचालय व स्नानगृहांची दुरावस्था बघुन संतप्त झालेल्या खासदार हेमंत पाटील यांनी अधिष्ठाता डॉ. वाकोडे व इतर डॉक्टरांना जाब विचारला असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे प्राप्त झाली नाही. उलट त्यांच्यावर खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला हा खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावे अशी कानोडी व वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने वसमतचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन मागणी केली आहे.
कानोडी व वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने सोमवारी (दि.९) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा स्वच्छता पंधरवाडा घोषित केला आहे. एक ऑक्टोबर रोजी देशभर स्वच्छता मोहिमेचे आयोजन देखील करण्यात आले होते. शिवाय एक तास श्रमदान अशी संकल्पना राबविण्यात आली. परंतु नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मात्र अशा प्रकारचा उपक्रम झाला नाही. म्हणून खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना सोबत घेऊन रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबविली तर त्यात गैर काय, उलट यात त्यांनी स्वतः देखील सहभाग घेऊन स्वच्छता मोहीम राबविली. तरीही पूर्वग्रह दूषित भावनेने, वैर भावनेने रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांनी चुकिच्या पद्धतीने अॅट्रॉसिटीच्या कायद्याचा दुरुपयोग करून खासदार हेमंत पाटील यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे.
त्याचा आम्ही सकल कानोडी, वाणी, वीरशैव लिंगायत समाज जाहीर निषेध करीत आहोत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदरील दाखल झालेला खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर संभाजी सिद्धेवार, विजय गंगेवार, सुभाष कोटे, शिवबा करडेके, ईश्वर कोटे, चंद्रकांत माळेवार, पांडुरंग कोटे यांच्यासह अनेकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!