अर्थकारणआपला जिल्हाताज्या घडामोडी

वसमत शासकीय स्त्री रुग्णालयाचा कारभार रामभरोसे! ३ महिन्यांपासून रुग्णवाहिका डिझेलविना धूळ खात; जिल्हा शल्यचिकित्सकांचाही कानाडोळा

विशेष प्रतिनिधी

वसमत शासकीय स्त्री रुग्णालयाचा कारभार रामभरोसे! ३ महिन्यांपासून रुग्णवाहिका डिझेलविना धूळ खात; जिल्हा शल्यचिकित्सकांचाही कानाडोळा

वसमत (CT NEWS ):

येथील शासकीय स्त्री रुग्णालयातील भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. मागील तीन महिन्यांपासून हक्काची रुग्णवाहिका केवळ ‘डिझेल’ अभावी बंद अवस्थेत उभी आहे. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब व गरजू महिला रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. असे असतानाही, कालच रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आलेल्या हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक (CS) डॉ. नितीन तडस यांनी या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
डिलिव्हरीसाठी महिलांना करावा लागतोय स्वखर्चाने प्रवास
वसमत येथील शासकीय स्त्री रुग्णालयामध्ये ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर डिलिव्हरी (प्रसूती) व इतर उपचारांसाठी येत असतात. मात्र, ऐन आणीबाणीच्या वेळी हक्काची शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे, या महिलांना खाजगी गाड्या करून किंवा पदरचे हजारो रुपये खर्च करून रुग्णालयात यावे लागत आहे. वेळेवर वाहन न मिळाल्यास रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
औषध गोळ्यांचा तुटवडा; आणायलाही गाडी मिळेना!
धक्कादायक बाब म्हणजे, या रुग्णालयात केवळ रुग्णवाहिकाच बंद नाही, तर रुग्णांसाठी लागणाऱ्या आवश्यक औषध-गोळ्यांचाही मोठा तुटवडा भासत आहे. रुग्णालयात उपचारार्थ येणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषधे घ्यावी लागत आहेत. रुग्णांसाठी औषध साठा आणायचा असल्यास त्यासाठीही रुग्णवाहिका किंवा वाहन उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या ‘त्या’ दौऱ्याने नागरिक संतप्त!
काल हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी वसमत शासकीय स्त्री रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकारी आल्यामुळे तीन महिन्यांपासून बंद असलेल्या रुग्णवाहिकेचा आणि औषध तुटवड्याचा प्रश्न सुटेल अशी आशा होती. मात्र, डॉ. तडस यांनी या बंद रुग्णवाहिकेकडे साधी नजरही टाकली नाही की त्याची पाहणी केली नाही. याकडे कानाडोळा करण्याचे नेमके कारण काय? संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोणाचा वरदहस्त आहे? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
“ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ थांबला पाहिजे. संबंधित जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रुग्णांना यातना सहन कराव्या लागत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तात्काळ रुग्णवाहिका सुरू करण्यात यावी आणि औषध पुरवठा सुरळीत व्हावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.” — छाया नागेश चव्हाण, वसमत

(या संदर्भात अधिक माहितीसाठी शासकीय स्त्री रुग्णालय येथील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून सविस्तर तांत्रिक कारणांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!