मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी घेतला वसमत येथील विकासकामांचा व घरकुल योजनेचा आढावा
संपादक हरनामसिंग चव्हाण

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी घेतला वसमत येथील विकासकामांचा व घरकुल योजनेचा आढावा
वसमत CT NEWS
वसमत:
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेकजी गायकवाड साहेब यांनी आज, ११ जुलै २०२६ रोजी वसमत येथील ‘मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन केंद्र’ आणि ‘पंचायत समिती वसमत’ ला भेट देऊन विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.
हळद संशोधन केंद्राची पाहणी
सीईओ गायकवाड यांनी सर्वप्रथम मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राला भेट दिली. यावेळी केंद्रात सुरू असलेले हळद संशोधन प्रकल्प, नवीन तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारे प्रशिक्षण कार्यक्रम यांची त्यांनी सविस्तर माहिती घेतली. संशोधन केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा पोहोचवता येईल, यादृष्टीने त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
घरकुल योजनेचा सविस्तर आढावा
त्यानंतर पंचायत समिती येथे आयोजित बैठकीत त्यांनी ‘पंतप्रधान आवास योजना – ग्रामीण’ (PMAY-G) अंतर्गत सुरू असलेल्या घरकुल बांधकामांची सद्यस्थिती जाणून घेतली. घरकुलांची एकूण मंजुरी, प्रगतीपथावर असलेली कामे आणि प्रलंबित प्रकरणांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. गोरगरीब लाभार्थ्यांची घरे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे कडक निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
“सर्व विकासकामे आणि घरकुल योजनांची कामे विहित मुदतीत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत, जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत वेळेत पोहोचेल.”
श्री. विवेकजी गायकवाड (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद)
अधिकारी व कर्मचारी उपस्थिती
या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान वसमत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) श्री. तोटेवाड साहेब, कृषी अधिकारी यांच्यासह पंचायत समितीचे व संशोधन केंद्राचे इतर सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माहिती व जनसंपर्क अधिकारी
पंचायत समिती, वसमत
छाया व वृत्त: नागेश चव्हाण, वसमत



