आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

पत्रकारांना घरांसाठी शासकीय जागा द्या व्हाईस ऑफ मिडीयाची मागणी

वसमत / रामु चव्हाण
… समाजातील विविध घटकांच्या समस्या शासनदरबारी मांडत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्य करणाऱ्या पत्रकार बांधवांच्या हक्काच्या घराचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकारांना घरकुलासाठी शासकीय जागा अथवा भूखंड उपलब्ध करून द्यावेत, तसेच घरकुल योजनांचा लाभ मिळावा, या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष पंजाब नवघरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यातील पत्रकार बांधव सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. मात्र, समाजहितासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या अनेक पत्रकारांची आर्थिक परिस्थिती सामान्य असून, स्वतःचे घर उभारण्यासाठी त्यांच्याकडे जागा किंवा पुरेसे आर्थिक पाठबळ उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक पत्रकारांना कुटुंबासह वास्तव्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ही बाब लक्षात घेऊन व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेने पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न प्रशासनासमोर मांडला आहे. पत्रकार बांधवांना घरकुल उभारण्यासाठी शासकीय नियमानुसार जागा अथवा भूखंड उपलब्ध करून द्यावा, पत्रकारांसाठी स्वतंत्र घरकुल योजनाराबविण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, तसेच प्रधानमंत्री आवास योजना व इतर लागू घरकुल योजनांचा लाभ पात्र पत्रकारांना मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

पत्रकारांच्या घराचा प्रश्न हा केवळ एका व्यक्तीचा प्रश्न नसून त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्याशी निगडित आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज बनून काम करणाऱ्या पत्रकारांना स्वतःच्या हक्काच्या घरासाठी संघर्ष करावा लागणे ही चिंतेची बाब आहे. पात्र पत्रकारांची यादी तयार करून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करावी आणि त्यांना घरकुलासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासह स्वतंत्र घरकुल योजनेबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घ्यावा -पंजाब नवघरे .(हिंगोली जिल्हाध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना…..)

तसेच या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जिल्हास्तरावर विशेष समिती स्थापन करून पात्र पत्रकारांना न्याय द्यावा, अशीही मागणी करण्यात आली. सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना उपविभागीय अधिकारी, वसमत यांच्यामार्फत सादर करण्यात आले.
यावेळी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, सदस्य तसेच पत्रकार बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!