आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे MRI, सिटीस्कॅन मशीन आणि एक्सप्रेस विद्युत फिटर बसवा; रुग्ण कल्याण समिती सदस्य रविराज डोळसे यांचे निवेदन

वसमत CT NEWS संपादक: हरनामसिंग चव्हाण

उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे MRI, सिटीस्कॅन मशीन आणि एक्सप्रेस विद्युत फिटर बसवा; रुग्ण कल्याण समिती सदस्य रविराज डोळसे यांचे निवेदन

वसमत CT NEWS
संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमत:
उपजिल्हा रुग्णालय, वसमत येथील रुग्णांना अधिक दर्जेदार, आधुनिक आणि तातडीची आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रविराज डोळसे यांनी हिंगोलीचे माननीय जिल्हाधिकारी, आरोग्य सेवा उपसंचालक आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना एक सविस्तर निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी रुग्णालयातील विविध गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे तीव्र लक्ष वेधले आहे.
अपघातग्रस्त व गोरगरीब रुग्णांचे हाल; मशीन अभावी रेफर करण्याची वेळ
निवेदनात नमूद केल्यानुसार, वसमत हे तालुक्याचे मुख्य केंद्र असून आजूबाजूच्या अनेक लहान-मोठ्या गावांतील शेकडो रुग्ण दररोज उपचारासाठी या उपजिल्हा रुग्णालयात येतात. मात्र, अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सिटीस्कॅन (CT Scan) आणि एमआरआय (MRI) मशीन उपलब्ध नसल्यामुळे गंभीर जखमी तसेच अपघातग्रस्त रुग्णांना पुढील उपचारासाठी इतर शहरांत रेफर करावे लागते. या प्रवासातील विलंबामुळे अनेकदा रुग्णांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. वसमत येथे ही यंत्रसामग्री तातडीने उपलब्ध झाल्यास गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना वेळेत निदान व उपचार मिळून मोठा दिलासा मिळेल, अशी आग्रही मागणी डोळसे यांनी केली आहे.
वीज खंडित झाल्याने अंधाराचे साम्राज्य; डायलिसिस विभागाला फटका
रुग्णालयातील वीज पुरवठ्याच्या गंभीर समस्येवरही या निवेदनातून बोट ठेवण्यात आले आहे. रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णांना तब्बल दोन ते तीन तास अंधारात थांबावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच सुरू झालेल्या डायलिसिस विभागाला वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे सेवा देण्यात मोठे अडथळे येत आहेत. यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ होत असून रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून रुग्णालयासाठी ‘एक्सप्रेस विद्युत फिटर’ बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाकडे तातडीने अंमलबजावणीची मागणी “वसमत उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा सक्षम करून आधुनिक वैद्यकीय उपकरणे तातडीने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था करून नागरिकांना हक्काची दर्जेदार आरोग्यसेवा द्यावी, हीच आमची प्रशासनाकडे मागणी आहे.”
— रविराज डोळसे (सदस्य, रुग्ण कल्याण समिती, वसमत)
या संदर्भातील सविस्तर अहवाल व छायाचित्रे छाया नागेश चव्हाण (वसमत) यांनी उपलब्ध करून दिली असून, आता जिल्हा प्रशासन या गंभीर समस्येवर काय पावले उचलते, याकडे संपूर्ण वसमत तालुक्याचे लक्ष लागले आहे.
बातमी संकलन व छायाचित्रे: छाया नागेश चव्हाण, वसमत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!