वसमतच्या सौरभ गुजराथी यांची बी.ए.एम.एस.साठी राज्य कोट्यातून निवड!
रामु चव्हाण

वसमतच्या सौरभ गुजराथी यांची बी.ए.एम.एस.साठी राज्य कोट्यातून निवड
कोणतीही शिकवणी न लावता घरच्या घरी अभ्यास करून मिळवले यश; वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न साकार
वसमत (प्रतिनिधी) : वसमत येथील श्री बालाजी फोटो स्टुडिओचे संचालक संजय गुजराथी यांचे चिरंजीव सौरभ संजय गुजराथी यांनी नीट (NEET-2026) परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून बी.ए.एम.एस. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राज्य कोट्यातून सौ. शांतादेवी वैदप्रकाश पाटील आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, हिंगोली येथे प्रवेश मिळवला आहे.
विशेष म्हणजे, सौरभ यांनी नांदेड, लातूर किंवा वसमत येथे कोणत्याही प्रकारची खासगी शिकवणी न लावता घरीच सातत्यपूर्ण व नियोजनबद्ध अभ्यास करून हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे गुजराथी परिवारासह वसमत शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सौरभ यांचे वडील संजय गुजराथी हे वसमत येथे छोटासा फोटो स्टुडिओ व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत मुलाला वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळणे हे त्यांच्यासाठी एक स्वप्न होते. मात्र, आपल्या कुटुंबाच्या परिस्थितीची जाणीव ठेवून सौरभ यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर हे स्वप्न सत्यात उतरवले. त्यांच्या या यशाने वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले असून, त्यांच्या कष्टाचे चीज झाले आहे.
यशाबद्दल बोलताना सौरभ यांनी सांगितले की, भविष्यात वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून जनतेची आरोग्यसेवा करण्यासाठी सदैव तत्पर राहणार असून, जनसेवेची संधी मिळत असल्याचा आनंद आहे.
आपल्या या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या आजी से.नि. मुख्याध्यापिका श्रीमती के. के. पत्ती/गुजराथी मॅडम, आई-वडील, काका सचिन गुजराथी (पोस्ट मास्टर वसमत) काकू, दीदी तसेच मित्रपरिवाराला दिले आहे.
सौरभ यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



