आपला जिल्हा

प्रशासनाच्या दिरंगाईला कंटाळून शेतकऱ्याचा थेट भूमी अभिलेख कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा! वसमतमध्ये खळबळ; ११ वर्षांपासून प्रलंबित क्षेत्र दुरुस्ती प्रकरणाचा तिढा, ५ जूनपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे भूमी अभिलेखचे आश्वासन

संपादक हरनामसिंग चव्हाण

प्रशासनाच्या दिरंगाईला कंटाळून शेतकऱ्याचा थेट भूमी अभिलेख कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा!
वसमतमध्ये खळबळ; ११ वर्षांपासून प्रलंबित क्षेत्र दुरुस्ती प्रकरणाचा तिढा, ५ जूनपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे भूमी अभिलेखचे आश्वासन

वसमत CT NEWS

वसमत (विशेष प्रतिनिधी):
येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे आणि मागील ११ वर्षांपासून न्याय न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने थेट भूमी अभिलेख कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मौजे रुखी (ता. वसमत) येथील मारोतराव गंगाराम फेगडे (रा. रेउळगाव) असे या हताश झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या इशाऱ्यामुळे महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
११ वर्षांचा वनवास; जिवंतपणी न्याय मिळण्याची आशा उरली नाही!
मिळालेल्या माहितीनुसार, मारोतराव फेगडे यांनी मौजे रुखी येथील सर्व्हे नं. १३/क व १५ क (गट क्र. ५८, ६२, ८४ व ८२) च्या क्षेत्र दुरुस्ती संदर्भात भूमी अभिलेख विभागाकडे अपील दाखल केले होते. या अपिलाचा निर्णय सन २०१५ मध्येच फेगडे यांच्या बाजूने लागला होता. मात्र, निर्णय होऊन ११ वर्षे उलटली तरीही त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही.
“मागील ११ वर्षांच्या काळात सतत चकरा मारूनही न्याय न मिळाल्याने माझा या कार्यालयाच्या कार्यपद्धतीवरचा विश्वास उडाला आहे. मला आता जिवंतपणी न्याय मिळण्याची अपेक्षा राहिलेली नाही,” अशी अत्यंत उद्विग्न भावना शेतकरी फेगडे यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. क्षेत्र दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे न पाठवल्यास २५ मे २०२६ रोजी कार्यालयासमोरच आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी लेखी पत्राद्वारे कळवले होते.
जायमोक्यावर वाद आणि पंचनामा
या संदर्भात भूमी अभिलेख कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या पत्राच्या अनुषंगाने त्रुटी पूर्तता करण्यासाठी ७ एप्रिल २०२६ रोजी शिरस्तेदार व निमतानदार हे प्रत्यक्ष जमिनीची मोजणी व चौकशी करण्यासाठी गेले होते. मात्र, तेथे अर्जदार आणि गैरअर्जदार यांच्यात तीव्र वाद निर्माण झाल्यामुळे मोजणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही आणि तसा पंचनामा कर्मचाऱ्यांनी नोंदवला होता.
प्रशासनाची धावपळ; ५ जूनपर्यंतची मुदत
शेतकऱ्याने थेट आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ नमती भूमिका घेत त्रुटी पूर्ततेची कार्यवाही गतीने सुरू केली आहे. उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने फेगडे यांना लेखी पत्राद्वारे विनंती केली आहे की, “या प्रकरणातील त्रुटी दूर करून हा प्रस्ताव येत्या ५ जून २०२६ च्या आत वरिष्ठ कार्यालयाकडे सत्वर सादर करण्याची पूर्ण दक्षता घेतली जाईल. त्यामुळे आपण आत्मदहनासारख्या टोकाचे पाऊल उचलून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये”.
दरम्यान, कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून भूमी अभिलेख कार्यालयाने वसमत शहर आणि हट्टा पोलीस ठाण्याला या प्रकरणाची माहिती देऊन पुढील कार्यवाहीची प्रत रवाना केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!