विहार करणाऱ्या जैन साधू-संतांच्या सुरक्षेसाठी ‘संत सुरक्षा प्रोटोकॉल’ लागू करा; बसमत येथे सकल जैन समाजाचे प्रशासनाला निवेदन
संपादक हरनामसिंग चव्हाण

विहार करणाऱ्या जैन साधू-संतांच्या सुरक्षेसाठी ‘संत सुरक्षा प्रोटोकॉल’ लागू करा; बसमत येथे सकल जैन समाजाचे प्रशासनाला निवेदन
वसमत CT NEWS
संपादक हरनामसिंग चव्हाण
विहार करणाऱ्या जैन साधू-संतांच्या सुरक्षेसाठी देशपातळीवर ‘राष्ट्रीय संत सुरक्षा नीती’ व ‘संत सुरक्षा प्रोटोकॉल’ लागू करावा, तसेच नुकत्याच झालेल्या आर्यिका माताजी यांच्या अपघाताची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करावी, या मागणीसाठी आज सकल जैन समाज बसमतच्या वतीने उपविभागीय अधिकारी (SDO) यांना निवेदन देण्यात आले.
नुकतीच विहार करत असलेल्या पूज्य आर्यिका माताजी यांच्या संघाला एका वाहनाने अत्यंत क्रूरपणे चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघातात पूज्य आर्यिका माताजींचे अकाली समाधीमरण (निधन) झाले. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जैन समाजात तीव्र दुःख, संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज, २५ मे २०२६ रोजी बसमत येथील सकल जैन समाजाच्या शिष्टमंडळाने प्रशासनाची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले.
घातपाताची शंका; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ही घटना केवळ एक साधा रस्ता अपघात मानली जाऊ शकत नाही. उपलब्ध तथ्ये आणि व्हिडिओ क्लिप्स पाहता यामध्ये काहीतरी घातपात असण्याची दाट शंका समाजात निर्माण झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत निष्पक्ष, पारदर्शक आणि उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. जैन साधू-संत हे पूर्णपणे नि:शस्त्र, अहिंसक आणि पायी विहार करणारे तपस्वी असतात. त्यांच्यावर अशा प्रकारे होणारे सततचे अपघात आणि हल्ले हे संपूर्ण समाजासाठी अत्यंत चिंताजनक आहेत.
सकल जैन समाजाच्या प्रमुख मागण्या
१. घटनेची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी
या प्रकरणाची SIT (विशेष तपास पथक) किंवा न्यायिक चौकशी करण्यात यावी.
घटनेशी संबंधित सर्व सीसीटीव्ही (CCTV), व्हिडिओ आणि डिजिटल पुरावे तात्काळ सुरक्षित करण्यात यावेत.
दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जर हा पूर्वनियोजित कट किंवा षड्यंत्र असल्याचे समोर आले, तर संबंधितांवर कठोर कलमांन्वये गुन्हे दाखल करावेत.
संत सुरक्षा प्रोटोकॉल’ लागू करावा
विहार मार्गांवर प्रशासकीय समन्वय साधला जावा.
संवेदनशील क्षेत्रांमध्ये जैन साधू-संतांच्या विहारा दरम्यान पोलीस सहकार्य मिळावे.
ट्रॅफिक नियंत्रण, योग्य चेतावणी संकेत (Signboards) लावण्यात यावेत.
हायवे आणि गर्दीच्या भागात साधू-संतांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्याचे आदेश प्रशासनाने द्यावेत.
या मागण्यांचे निवेदन आज उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले असून, प्रशासनाने यावर तात्काळ गांभीर्याने पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी बसमत येथील सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रसंगी जैन समाजातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



