वसमतमध्ये घरफोडी; २ लाख १८ हजारांच्या ऐवजासह रोकड लंपास!
वसमत / रामु चव्हाण
शहरातील शिवाजी नगर भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर हात साफ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत एकूण २ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून, याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी एकनाथ गंगाधर काळे (वय ३६, रा. शिवाजी नगर, वसमत) हे आपल्या कुटुंबासह राहतात. दिनांक २३ मे २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजताच्या सुमारास ते आपल्या पत्नी, मुलाबाळांसह महाराष्ट्र दर्शनासाठी गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांचे घर बंद होते.
असा उघडकीस आला प्रकार: फिर्यादी काळे हे २५ मे २०२६ रोजी रात्री १:३० वाजताच्या सुमारास प्रवास आटोपून घरी परतले. घरी आल्यावर त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले आणि दरवाजा उघडा आढळला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता, बेडरूममधील कपाटाचे कुलूप तोडून आतील सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. कपाटाच्या लॉकरची पाहणी केली असता, त्यातील दागिने आणि रोकड गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चोरीला गेलेला मुद्देमाल: चोरट्यांनी कपाटातून खालील मुद्देमाल लंपास केला आहे:
६ ग्रॅम सोन्याचे लॉकेट
१२ ग्रॅम कानातील सोन्याचे झुमके
०१ ग्रॅम सोन्याची नथ
०१ ग्रॅम सोन्याचे मणी ०१ ग्रॅम सोन्याची अंगठी
(असे एकूण २१ ग्रॅम सोन्याचे दागिने, अंदाजे किंमत रु. २,००,०००/-)
१० तोळे चांदीचे दागिने (अंदाजे किंमत रु. १०,०००/-)
नगदी ८,०००/- रुपये
अशा प्रकारे एकूण २ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. फिर्यादी एकनाथ काळे यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, चोरीला गेलेला माल आणि आरोपींचा शोध व पुढील तपास वसमत पोलीस करत आहेत.