आपला जिल्हासामाजिक

वसमत शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त; शहर काँग्रेस कमिटी आक्रमक,

मुख्य संपादक रामु चव्हाण

वसमत शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त; शहर काँग्रेस कमिटी आक्रमक, महावितरणला आंदोलनाचा इशारा!

वसमत :रामु चव्हाण

वसमत शहरामध्ये मागील सहा महिन्यांपासून वीज पुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेच्या काळात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि रुग्णांचे हाल होत आहेत. या समस्येची दखल घेत शहर काँग्रेस कमिटीने महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना लेखी निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, तसेच सकारात्मक निर्णय न झाल्यास ‘भव्य कंदील मोर्चा’ काढण्याचा इशारा दिला आहे.
मोंढा फीडरवर वाढीव भाराचा (Overload) गंभीर प्रश्न
काँग्रेस कमिटीने दिलेल्या निवेदनानुसार, वसमत शहरातील मोंढा फीडरवर शहरासोबतच ग्रामीण भागातील अनेक नवीन वस्त्या व वसाहतींचा वीज पुरवठा जोडण्यात आला आहे. यामुळे या फीडरवर अतिरिक्त भार निर्माण होत असून, वारंवार ट्रिपिंग होणे, तांत्रिक बिघाड होणे आणि वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत.
दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम
शहरातील विविध भागांमध्ये दिवसभरात अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे. काही वेळा सलग एक ते दोन तास वीज नसल्यामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. याचा विपरीत परिणाम कार्यालयीन कामकाज, व्यापाऱ्यांचे व्यवहार, शैक्षणिक उपक्रम आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून याकडे पुरेशे लक्ष दिले जात नसल्याने व तांत्रिक नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
काँग्रेस कमिटीच्या प्रमुख मागण्या:
१. वसमत शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याची सखोल चौकशी करण्यात यावी.
२. मोंढा फीडरवरील वाढीव भाराचे तांत्रिक परीक्षण करून आवश्यक असल्यास स्वतंत्र फीडरची निर्मिती करावी.
३. ग्रामीण भागातील अतिरिक्त जोडण्या व भार व्यवस्थापनाबाबत योग्य नियोजन करावे.
४. वारंवार होणाऱ्या ट्रिपिंगची कारणे शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
५. वसमत शहरातील नागरिकांना अखंड, दर्जेदार व सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा.
६. संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून प्रशासकीय कारवाई करावी.
…अन्यथा महावितरण कार्यालयावर ‘कंदील मोर्चा’!
या मागण्यांबाबत महावितरण प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास, वसमत शहरातील नागरिकांच्या वतीने महावितरण कार्यालयावर *भव्य कंदील मोर्चा* काढण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीस संपूर्णपणे महावितरण प्रशासन जबाबदार राहील, असेही यात नमूद केले आहे.
हे निवेदन शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख अलिमोद्दीन, तालुकाध्यक्ष अॅड. ऋषिकेश देशमुख, आणि गटनेते युवराज आवटे यांच्या स्वाक्षरीने महावितरण प्रशासनाला सुपूर्द करण्यात आले असून, याच्या प्रती माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली आणि महावितरण हिंगोली मंडळ कार्यालयाला देखील पाठवण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!