मानवत येथे सिकलीगर शीख समाजावर अमानुष जीवघेणा हल्ला; महिलांचा विनयभंग, धार्मिक भावना पायदळी तुडवल्या! दोषींवर त्वरित ‘एफआयआर’ दाखल करून अटकेची मागणी; परभणी पोलीस अधीक्षकांना शेकडो समाजबांधवांच्या उपस्थितीत निवेदन
विशेष प्रतिनिधी

मानवत येथे सिकलीगर शीख समाजावर अमानुष जीवघेणा हल्ला; महिलांचा विनयभंग, धार्मिक भावना पायदळी तुडवल्या!
दोषींवर त्वरित ‘एफआयआर’ दाखल करून अटकेची मागणी; परभणी पोलीस अधीक्षकांना शेकडो समाजबांधवांच्या उपस्थितीत निवेदन
मानवत (विशेष प्रतिनिधी):
पूर्ववैमनस्यातून सिकलीगर शीख समाजातील निष्पाप महिला व पुरुषांवर लोखंडी रॉड, लाठ्या आणि घातक शस्त्रांनी अत्यंत अमानुष व जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना मानवत येथे घडली आहे. या हैवानियत कृत्य करणाऱ्या हल्लेखोरांनी महिलांचा विनयभंग तर केलाच, पण शीख धर्माची अत्यंत पवित्र मानली जाणारी ‘पगडी’ (दस्तार) जमिनीवर फेकून आणि पवित्र ‘केश’ धरून फरफटत मारहाण केल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील शीख समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
घातक शस्त्रांनी हल्ला; दोन जण मृत्यूशी झुंज देत आहेत!
प्राप्त माहितीनुसार, दि. ०८/०७/२०२६ रोजी आरोपी विक्रम सिंह दहे, अभय दहे, अविनाश दहे, रवि दहे, आकाश दहे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी संगनमत करून पीडित कुटुंबाला टार्गेट केले. लोखंडी रॉड, लाठ्या आणि जीवघेण्या शस्त्रांनिशी आलेल्या या टोळक्याने निष्पाप कुटुंबावर हल्ला चढवला. या अमानुष मारहाणीत कुटुंबातील दोन व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाल्या असून, गेल्या ५ दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. ते सध्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) मृत्यूशी झुंज देत आहेत.
महिलांची विटंबना आणि धार्मिक भावनांचा तीव्र अवमान
हल्ल्याची भीषणता एवढी होती की, नराधम हल्लेखोरांनी महिलांनाही सोडले नाही. पीडित सतकोर आयासिंग बावरी आणि इतर महिलांचे केस धरून त्यांना भररस्त्यात निघृणपणे मारहाण करत त्यांचा विनयभंग करण्यात आला.
त्याहूनही गंभीर बाब म्हणजे, शीख धर्मात प्राणापलीकडे जपली जाणारी धार्मिक प्रतीके पायदळी तुडवण्यात आली. पुरुषांच्या डोक्यावरील पवित्र ‘दस्तार’ (पगडी) जबरदस्तीने खेचून जमिनीवर फेकण्यात आली, व पवित्र ‘केश’ धरून पुरुषांना रस्त्यावरून फरफटत मारहाण करण्यात आली. या नीच कृत्यामुळे सिकलीगर शीख समाजाच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत.
शेकडो समाजबांधवांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षकांची घेतली भेट
घटनेचे गांभीर्य पाहता, पीडित महिला सतकोर आयासिंग बावरी यांच्यासह सिकलीगर शीख समाजातील प्रतिष्ठित व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि शेकडो महिला-पुरुषांनी थेट परभणी गाठले. परभणीचे पोलीस अधीक्षक (SP) आणि मानवत पोलीस निरीक्षकांना या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती देऊन लेखी निवेदन सादर करण्यात आले.
“आरोपींनी केवळ कायदा हातात घेतला नाही, तर एका शांतताप्रिय समाजाची धार्मिक अस्मिता धुळीस मिळवली आहे. सर्व दोषी आरोपींवर तात्काळ गुन्हा (FIR) नोंदवून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी,” अशी आग्रही मागणी याप्रसंगी समाजबांधवांनी केली.
पोलीस प्रशासनाचे कडक कारवाईचे आश्वासन
या प्रकरणाची संवेदनशीलता आणि लोकांचा रोष लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आहे. पोलीस अधीक्षकांनी पीडित कुटुंबीयांना आणि उपस्थित शिष्टमंडळाला आश्वस्त केले की, “सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.”
सध्या मानवत परिसरामध्ये या घटनेमुळे कमालीचे तणावपूर्ण वातावरण असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासन आता काय ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



