वसमतमध्ये महावितरणचा भोंगळ कारभार; संतप्त युवकाचे भर उन्हात ‘एकला चलो रे’ आंदोलन!
संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमतमध्ये महावितरणचा भोंगळ कारभार; संतप्त युवकाचे भर उन्हात ‘एकला चलो रे’ आंदोलन!
वसमत (CT NEWS ): वसमत शहरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव आणि महावितरणच्या कारभारामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या वाढत्या त्रासाला आणि महावितरणच्या निष्काळजीपणाला वाचा फोडण्यासाठी आज वसमत येथील महावितरण कार्यालयासमोर तरुण सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील अमृतवार यांनी भर उन्हात हातात फलक (बॅनर) घेऊन थेट आंदोलन पुकारले. त्यांच्या या ‘एकला चलो रे’ आंदोलनाने आज शहरातील प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली.
‘इंजिनिअर झोपतो एसीमध्ये, गरीब जनता…’; फलकावरील मजकुराने वेधले लक्ष
आंदोलक स्वप्नील अमृतवार यांनी हातात घेतलेल्या फलकावर महावितरणच्या अधिकाऱ्यांवर अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधण्यात आला होता.
“वसमतची लाईट बेपत्ता, याला महावितरणचा इंजिनिअर जबाबदार” आणि “इंजिनिअर झोपतो एसी मध्ये, गरीब जनता मरते उन्हामध्ये” अशा आशयाचा मजकूर लिहीत त्यांनी वीज ग्राहकांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
नागरिकांमध्ये तीव्र असंतोष
सध्या उन्हाळ्याचा पारा प्रचंड वाढलेला असताना, वसमत शहरात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सामान्य नागरिक, व्यापारी आणि लहान मुले प्रचंड उकाड्याने हैराण झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही महावितरणचे स्थानिक अभियंता आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
अधिकारी स्वतः सुखसुविधांमध्ये राहत असताना सामान्य जनतेला मात्र अंधारात आणि उकाड्यात का सडावे लागते, असा संतप्त सवाल या आंदोलनाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे.
आंदोलनाची शहरात चर्चा
कोणतीही मोठी गर्दी न जमवता, केवळ एका युवकाने जनतेच्या हक्कासाठी थेट महावितरण कार्यालयासमोर, कडक उन्हात उभे राहून केलेले हे मूक पण तितकेच आक्रमक आंदोलन आज वसमतकरांच्या कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरले. महावितरण प्रशासन आतातरी या आंदोलनाची दखल घेऊन वसमतचा वीज पुरवठा सुरळीत करणार की आंदोलनाची धार आणखी तीव्र होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




