औंढ्यात खळबळ: अन्न व औषध प्रशासनाची पेढे विक्रेत्यांवर धडक कारवाई; ९३ किलो निकृष्ट खवा नष्ट! ७ खव्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत रवाना वसमत कनेक्शन उघड; हिंगोली प्रशासनाची मोठी कारवाई
संपादक हरनामसिंग चव्हाण

औंढ्यात खळबळ: अन्न व औषध प्रशासनाची पेढे विक्रेत्यांवर धडक कारवाई; ९३ किलो निकृष्ट खवा नष्ट!
७ खव्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत रवाना
वसमत कनेक्शन उघड; हिंगोली प्रशासनाची मोठी कारवाई
वसमत CT NEWS
हिंगोली:
पवित्र श्रावण महिना आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ परिसरात अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) मोठी धडक कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. यामध्ये तब्बल ९३ किलो निकृष्ट दर्जाचा खवा जागीच नष्ट करण्यात आला असून, यामुळे भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
१० मिठाई विक्रेत्यांची अचानक तपासणी
औंढा नागनाथ देवस्थान परिसरात पेढे आणि मिठाईमध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने आज अचानक परिसरातील १० प्रमुख मिठाई विक्रेत्यांच्या आस्थापनांवर धाडी टाकल्या. या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार विविध नियमांची पडताळणी करण्यात आली.
विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांना ‘दुकान बंद’चे आदेश
कारवाई दरम्यान ज्या मिठाई विक्रेत्यांकडे अन्न नोंदणी किंवा वैध परवाना (License) आढळून आला नाही, त्यांना प्रशासनाने तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. तसेच, संशयास्पद वाटणाऱ्या खव्याचे ७ वेगवेगळे नमुने पुढील रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या तपासणीत अस्वच्छ आणि चुकीच्या पद्धतीने साठवून ठेवलेला ९३ किलो खव्याचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला.
कारवाईचे ‘वसमत’ कनेक्शन!
औंढा नागनाथ येथील अन्न व्यावसायिक हा निकृष्ट दर्जाचा खवा वसमत येथील व्यापाऱ्यांकडून खरेदी करत असल्याची धक्कादायक माहिती चौकशीत समोर आली आहे. हे ‘वसमत कनेक्शन’ उघड होताच प्रशासनाने तात्काळ सूत्रे फिरवली असून, वसमत येथेही विशेष पथक पाठवून पुढील कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
या अधिकाऱ्यांच्या पथकाने केली कारवाई
ही धडक कारवाई सहायक आयुक्त श्री. खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी तुषार घोपे, श्रीमती सावंत, वैभव ठोंबरे आणि कृष्णा मुळे यांच्या पथकाने यशस्वीरी्या पार पाडली.
नागरिकांना आवाहन: “नागरिकांनी सणासुदीच्या काळात सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थांचीच खरेदी करावी. मिठाई किंवा इतर खाद्यपदार्थांबाबत कोणतीही शंका किंवा तक्रार असल्यास त्यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा.”
— श्रीकांत करकळे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, छत्रपती संभाजीनगर.


