करणीच्या संशयावरून वृद्ध पती-पत्नीची निर्घृण हत्या; स्थानिक गुन्हे शाखेने ३ आरोपींना ठोकल्या बेड्या
(वसमत CT NEWS मुख्य संपादक: रामू चव्हाण )
वसमत/ रामु चव्हाण
करणी (जादूटोणा) केल्याच्या अंधश्रद्धेतून एका वृद्ध पती-पत्नीची तीक्ष्ण हत्याराने निर्घृण हत्या करणाऱ्या ३ आरोपींना हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत शिताफीने अटक केली आहे. पारडा (ता. जि. हिंगोली) येथील शेत शिवारातील आखाड्यावर २१ जून २०२६ रोजी हा थरार घडला होता. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाले होती, मात्र पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे या अंधश्रद्धेच्या पाशवी कृत्याचा पर्दाफाश केला आहे.
अंधश्रद्धेतून घडले धक्कादायक हत्याकांड
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पारडा येथील रहिवासी अनिल बळीराम वाघमारे यांचे वृद्ध आई-वडील बळीराम देवबा वाघमारे व कलावती बळीराम वाघमारे हे २१ जून रोजी आपल्या शेतातील आखाड्यावर असताना, अज्ञात इसमांनी त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले. अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी राजू गौतम वाघमारे (वय ३३) याची प्रकृती वारंवार बिघडत होती. आपल्याला होणाऱ्या आजाराला मृत वृद्ध पती-पत्नीने केलेली ‘करणी’ कारणीभूत आहे, असा संशय राजूच्या मनात पक्का झाला होता.
मित्रांच्या मदतीने रचला कट
याच अंधश्रद्धेतून राजू वाघमारे याने आपले साथीदार राहुल सम्राट खंदारे (वय ३२, व्यवसाय-चालक, रा. इसापूर रमना) आणि अक्षय घनश्याम वाघमारे (वय ३०, रा. पारडा) यांना सोबत घेतले. या तिघांनी मिळून वृद्ध दांपत्याला शेतातील आखाड्यावर गाठले आणि त्यांचा जीव घेतला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.
हिंगोली एलसीबीची धडाकेबाज कामगिरी
पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मिना, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एस. अरसेवार यांच्या विशेष तपास पथकाने ही धडक कारवाई केली. या पथकात उपनिरीक्षक माधव जिव्हारे, अंमलदार पांडुरंग राठोड, गजानन पोकळे, लिंबाजी वाव्हळे, निरंजन नलवार यांच्यासह एलसीबीच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली.
अंधाऱ्या रात्री झालेल्या या गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना गजाआड करणाऱ्या संपूर्ण पोलीस पथकाचे पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी जाहीर अभिनंदन केले आहे.