खांडेगाव शिवारातील कालव्यावरील धोकादायक पुलाचा प्रश्न ऐरणीवर; तातडीने नवीन पूल बांधण्याची ‘मेघना दीदी बोर्डीकर मित्र मंडळा’ची मागणी
संपादक हरनामसिंग चव्हाण

खांडेगाव शिवारातील कालव्यावरील धोकादायक पुलाचा प्रश्न ऐरणीवर; तातडीने नवीन पूल बांधण्याची ‘मेघना दीदी बोर्डीकर मित्र मंडळा’ची मागणी
वसमत (विशेष प्रतिनिधी):
पूर्णा पाटबंधारे विभागाच्या वसमत शाखा कालव्यावरील खांडेगाव (ता. वसमत) शिवारात असलेला छोटा पूल अत्यंत जुना आणि जीर्ण झाला असून, तो सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. हा पूल कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने नवीन मोठ्या पुलाचे बांधकाम मंजूर करून ते काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी ‘राज्यमंत्री मेघना दीदी बोर्डीकर मित्र मंडळ’ आणि खांडेगावच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात मंडळाचे तालुकाध्यक्ष श्री. संदीप कदम पाटील यांनी सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना प्रत्यक्ष भेटून एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.
शेतकऱ्यांची गैरसोय आणि अपघाताची भीती
कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात खांडेगाव शिवारातील या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. या पत्रातील माहितीनुसार, वसमत शाखा कालव्याच्या कि.मी. २.०० वर असलेला हा पूल अतिशय अरुंद असून पूर्णपणे मोडकळीस आला आहे. या पुलावरून दररोज खांडेगाव परिसरातील शेकडो शेतकरी आपल्या शेतात ये-जा करतात, तसेच शेतमालाची वाहतूकही याच मार्गाने केली जाते. पूल पूर्णपणे जीर्ण झाल्यामुळे येथून वाहतूक करताना केव्हाही मोठा अपघात होऊन जीवित व वित्तहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
पर्यायी रस्ता नसल्याने ग्रामस्थ हवालदिल
विशेष म्हणजे, या ठिकाणापासून वरील भागात अंदाजे २ कि.मी. तसेच खालच्या भागात ‘पांगरा सती’ पर्यंत वाहतुकीसाठी दुसरा कोणताही पर्यायी पूल उपलब्ध नाही. शेतकऱ्यांची होणारी ही मोठी कोंडी आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन स्थानिक ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीने देखील या संदर्भात रीतसर ठराव घेतलेला आहे.
युद्धपातळीवर काम करण्याची मागणी
शेतकऱ्यांची होणारी मोठी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने या समस्येचे गांभीर्य ओळखावे आणि खांडेगाव शिवारातील या धोकादायक पुलाच्या ठिकाणी तातडीने नवीन मोठ्या पुलाचे बांधकाम मंजूर करावे, अशी आग्रही मागणी संदीप कदम पाटील व समस्त खांडेगाव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. यावर पाटबंधारे विभागाकडून सकारात्मक व जलद कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांमधून तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.



