राजकीय

परभणी-हिंगोली विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी ‘या’ तीन बड्या नेत्यांची नावे चर्चेत; राजकीय हालचालींना वेग!

संपादक हरनामसिंग चव्हाण

परभणी-हिंगोली विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी ‘या’ तीन बड्या नेत्यांची नावे चर्चेत; राजकीय हालचालींना वेग!

वसमत CT NEWS:
संपादक हरनामसिंग चव्हाण

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय वातावरणात कमालीची उष्णता निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडी आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली असून, सध्या वसमत परिसरातील तीन वजनदार नेत्यांची नावे राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत आहेत.
पक्ष श्रेष्ठी नेमकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार, याकडे आता संपूर्ण विभागाचे लक्ष लागले आहे.
१) अभ्यासू चेहरा: लक्ष्मीकांत नवघरे
विद्यमान आमदार राजू भैया नवघरे यांचे बंधू लक्ष्मीकांत नवघरे यांचे नाव सध्या आघाडीवर आहे.
मतदारसंघात एक अभ्यासू, सुशिक्षित आणि संयमी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. आमदार राजू भैया नवघरे यांच्या विकासकामांचा दांडगा जनसंपर्क आणि लक्ष्मीकांत नवघरे यांची प्रशासकीय व राजकीय प्रगल्भता यामुळे त्यांच्या उमेदवारीची पक्षात जोरदार चर्चा आहे.

२) जनतेत पकड असलेले: कन्हैया बाहेती
वसमत नगरपरिषदेच्या  नगराध्यक्षा श्रीमती सुनीता मनमोहनजी बाहेती यांचे चिरंजीव कन्हैया बाहेती हे देखील या शर्यतीत अतिशय मजबूत दावेदार मानले जात आहेत.
तरुण नेतृत्व, व्यापाऱ्यांपासून ते सर्वसामान्य जनतेत असलेली मोठी पकड आणि आ. राजू भैया नवघरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून कन्हैया बाहेती यांचे नाव समोर येत आहे.
बाहेती परिवाराचा असलेला जुना राजकीय वारसा आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी यामुळे त्यांच्या नावाला वजन प्राप्त झाले आहे.

३) प्रभावशाली व्यक्तिमत्व: उपनगराध्यक्ष शेख इम्रान अली
वसमत नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान अली हे या निवडणुकीतील तिसरे प्रमुख आणि तितकेच ताकदीचे नाव ठरत आहे.
मुस्लिम समाजासह सर्वधर्मीय समाजात असलेला त्यांचा दांडगा प्रभाव आणि अल्पसंख्याक मतदारांवर असलेली मजबूत पकड यामुळे पक्षासाठी ते एक हुकमी एक्का ठरू शकतात. रणनीती आखण्यात पटाईत आणि आक्रमक नेते म्हणून सय्यद इम्रान यांच्या नावाची पक्षात गंभीरतेने चर्चा सुरू आहे.

पक्ष कोणाला देणार संधी? उत्सुकता शिगेला!

हे तिन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अत्यंत निष्ठावान आणि आपापल्या क्षेत्रात भक्कम जनाधार असलेले मानले जातात. एका बाजूला नवघरे परिवाराची राजकीय ताकद, दुसऱ्या बाजूला बाहेती पॅटर्नची जनतेवरील पकड आणि तिसऱ्या बाजूला सय्यद इम्रान यांचे प्रभावशाली नेतृत्व… अशा त्रिकोणी स्पर्धेत पक्ष कोणावर विश्वास दाखवतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सध्या तरी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांमध्ये आणि राजकीय कट्ट्यांवर या तिघांच्याच नावाची चर्चा सर्वात जास्त जोर धरत असून, लवकरच याबाबत वरिष्ठ पातळीवरून हालचाली होण्याची शक्यता आहे.

प्रतिनिधी, वसमत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!