हिंगोली / रामु चव्हाण
संकट काळात नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या ‘डायल ११२’ या हेल्पलाईन सुविधेमुळे आणि औंढा नागनाथ पोलिसांच्या कमालीच्या तत्परतेमुळे एका महिलेचे प्राण वाचले आहेत. अवघ्या १४ मिनिटांत घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर काढले.
काय घडली घटना?
दिनांक २९ मे २०२६ रोजी रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास, नवीन वसाहत असोला (जवळ जवळा बाजार) येथील ‘किर्तने’ नावाच्या एका नागरिकाने ‘डायल ११२’ वर कॉल केला. त्यांनी माहिती दिली की, त्यांच्या नात्यातील एक महिला खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे.
माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. गणेश राहीरे, पोलीस अमलदार अनिल नागुलकर, चालक संतोष धनवे आणि संतोष पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता औंढ्याहून असोला येथील घटनास्थळाकडे कूच केली.
अवघ्या १४ मिनिटांत पोलीस घटनास्थळी!
तक्रारदाराचा फोन आल्यापासून अवघ्या १४ मिनिटांत पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. तिथे एका खोलीमध्ये एका मुलीने डब्यावर डबे ठेवून, छताला सिसिलींग दोरी बांधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने खोलीत प्रवेश केला आणि त्या महिलेला तात्काळ बाजूला काढून आत्महत्येपासून परावृत्त केले. पोलिसांच्या या देवदूतासारख्या एन्ट्रीमुळे एका कुटुंबाचा आक्रोश टळला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि कौतुक
हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्री. डॉ. नीलाभ रोहन यांचे ‘डायल ११२’ च्या कामकाजावर बारीक लक्ष असते. पीडित व्यक्तींना तात्काळ मदत मिळावी यासाठी ते सातत्याने ठाणेदारांना सूचना देत असतात.
या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री. डॉ. नीलाभ रोहन, वसमतचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) श्री. राजकुमार केंद्रे यांनी पोलीस निरीक्षक गणेश राहीरे, पोलीस अमलदार अनिल नागुलकर, संतोष धनवे आणि संतोष पवार यांच्या धाडसाचे व तत्परतेचे कौतुक केले आहे.
पोलिसांचे आवाहन: संकटकाळी ‘डायल ११२’ वर कॉल करा
हिंगोली पोलीस प्रशासनाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही संकटकाळात पोलीस मदतीसाठी ‘डायल ११२’ या निशुल्क (टोल फ्री) क्रमांकावर कॉल करावा. हिंगोली पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव समर्थ आणि कटिबद्ध आहेत.