आपला जिल्हासामाजिक

रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात वसमतमध्ये १ जूनपासून ‘अनोखे आमरण उपोषण’; सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लोखंडे यांचा प्रशासनाला इशारा

मुख्य संपादक रामु चव्हाण

रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात वसमतमध्ये १ जूनपासून ‘अनोखे आमरण उपोषण’; सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लोखंडे यांचा प्रशासनाला इशारा

वसमत CT NEWS

मुख्य संपादक रामू चव्हाण

 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील उड्डाणपूल ते कॅनॉल दरम्यानचे जीवघेणे खड्डे कायमस्वरूपी बुजवण्यात यावेत आणि शासकीय स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, या मागण्यांसाठी येत्या १ जून २०२६ पासून उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयासमोर काळी पट्टी बांधून ‘अनोखे आमरण उपोषण’ करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लोखंडे थोरावेकर यांनी दिला आहे. यासंदर्भातील अधिकृत निवेदन त्यांनी प्रशासनाला सादर केले आहे.

 रुग्णांचे हाल आणि वाढते अपघात

प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वसमत तालुक्यातील भव्य शासकीय स्त्री रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या गणेशपूर, थोरावा, कागबन, सारोळा या गावांना जोडणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाला आहे. स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने रुग्ण, गरोदर महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील रेल्वे उड्डाणपूल ते कॅनॉल दरम्यानचे खड्डे आणि शहरातील ढिसाळ दुभाजक (डिव्हायडर) यामुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

यापूर्वी केले होते ‘पुस्तके वाचो आंदोलन’

या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रशांत लोखंडे यांनी यापूर्वी दोन वेळा रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बसून ‘पुस्तक वाचो आंदोलन’ केले होते. तसेच अनेक वेळा निवेदनेही दिली होती. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासनापलीकडे कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त होऊन आता थेट आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

१ जूनपासून उपोषणाचा निर्धार

जोपर्यंत या रस्त्यांच्या दुरुस्तीसंदर्भात प्रशासन ठोस उपाययोजना करत नाही आणि लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत दिनांक १ जून २०२६ पासून भर उन्हात उपविभागीय व दंडाधिकारी कार्यालयासमोर डोक्याला/हाताला काळी पट्टी बांधून हे अनोखे आमरण उपोषण सुरू केले जाईल. या आंदोलनादरम्यान माझ्या जीवितास काही बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशाराही लोखंडे यांनी निवेदनातून दिला आहे.

मुख्यमंत्र्यांसह उच्चपदस्थांना प्रतिलिपी

या आंदोलनाची दखल घेतली जावी यासाठी या निवेदनाच्या प्रतिलिपी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, राज्य रस्ते व वाहतूक मंत्री, हिंगोलीचे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. १९ मे रोजी हे निवेदन वसमत उपविभागीय कार्यालयात अधिकृतपणे सादर करण्यात आले असून, आता प्रशासन यावर काय पाऊल उचलते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!