वसमत नगरपरिषदेत पाणी पुरवठा कंत्राटी कामगारांचे ‘कामबंद’ आंदोलन; ९ महिन्यांचे वेतन थकीत असल्याने कर्मचाऱ्यांचे पाऊल
वसमत : रामु चव्हाण
वसमत नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील कंत्राटी कामगारांचे मागील ९ महिन्यांचे वेतन थकीत असल्याने, अखेर कंटाळलेल्या कामगारांनी १ जून २०२६ पासून ‘कामबंद’ आंदोलन सुरू केले आहे. ‘श्रमसाफल्य सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या, वसमत’ च्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना याबाबतचे अधिकृत निवेदन देण्यात आले आहे.
९ महिन्यांचे वेतन थकीत, कुटुंबावर उपासमारीची वेळ
मिळालेल्या माहितीनुसार, पाणी पुरवठा विभागातील कंत्राटी कामगारांचे माहे जून-२०२५ ते मार्च-२०२६ अशा एकूण ९ महिन्यांचे मानधन अद्याप मिळालेले नाही. वेतनाअभावी कामगारांवर आर्थिक संकट ओढवले असून त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
वारंवार विनंती करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ सुदाम भुजबळे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, थकीत वेतनाबाबत प्रशासनाला वारंवार लेखी व तोंडी विनंती करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. प्रशासनाच्या या वेळकाढू धोरणामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, नाईलाजास्तव त्यांनी १ जून २०२६ पासून काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता; प्रशासनाचा कस लागणार
कामगारांनी थेट कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे वसमत शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “यापुढे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे सुळीत वेतन चालू झाल्याशिवाय काम सुरू करणार नाही,” असा आक्रमक पवित्रा कामगारांनी घेतला आहे. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या सर्व त्रासाला वसमत नगरपरिषद प्रशासन संपूर्णपणे जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी (हिंगोली), नगरविकास विभाग कार्यालय (हिंगोली) आणि नगराध्यक्ष (वसमत नगरपरिषद) यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. आता प्रशासन यावर काय तोडगा काढते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.