वसमत येथे 3 मे रोजी डाॅ अजय जयप्रकाश मुंदडा यांच्या वतीने सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन
वसमत / रामु चव्हाण
वसमत येथे ३ मे रोजी २१ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा; सामाजिक बांधिलकीचा अनोखा उपक्रम
महागाई आणि नापिकीच्या पार्श्वभूमीवर गरजू कुटुंबांना दिलासा; नवदांपत्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन
वसमत / रामु.चव्हाण
वाढती महागाई आणि सततच्या नापिकीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी वसमत येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सेवा प्रतिष्ठाण यांच्या वतीने २१ वधू-वरांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
हा सोहळा रविवार, ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी ‘सप्तगिरी सिटी’ जवळ, खंदारबन रोड, वसमतनगर येथे पार पडणार आहे.
या उपक्रमामागे सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींचे विवाह सन्मानाने आणि थाटामाटात पार पाडण्याचा प्रतिष्ठाणचा उद्देश आहे. ग्रामीण भागात वाढती महागाई व शेतीतील अनिश्चिततेमुळे अनेक कुटुंबांना विवाह सोहळा पार पाडणे कठीण होत असताना, अशा सामूहिक विवाह सोहळ्यांमुळे त्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ. अजय जयप्रकाशजी मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, प्रतिष्ठाणचे पदाधिकारी, सदस्य व मित्रपरिवार यासाठी परिश्रम घेत आहेत. या सोहळ्यात सर्व वधू-वरांना आवश्यक साहित्य व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या मंगल प्रसंगी नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून नवदांपत्यांना शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. हा सोहळा सामाजिक एकात्मता आणि परस्पर सहकार्याचे उत्तम उदाहरण ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.