वसमत येथील अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयात नवागत विद्यार्थिनींचा ‘प्रवेशोत्सव’ उत्साहात संपन्न! क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यार्थिनींना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप
संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमत येथील अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयात नवागत विद्यार्थिनींचा ‘प्रवेशोत्सव’ उत्साहात संपन्न!
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन
विद्यार्थिनींना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप
वसमत (प्रतिनिधी):
स्थानिक अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय, वसमत येथे आज सोमवार, दिनांक १५ जून रोजी नवागत विद्यार्थिनींचा ‘प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेत पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थिनींचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अत्यंत जिव्हाळ्याने स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाराशिव शिक्षण संस्थेचे व विद्यालयाचे अध्यक्ष प्रा. श्री. बी.डी. कदम हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून हिंगोली जिल्हा परिषदेचे उपमुख्याधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी मा. श्री. ओम जाधव साहेब, वसमत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. सतीश कास्टे, माजी गटशिक्षणाधिकारी मा. श्री. तानाजीराव भोसले, बाराशिव शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री. विक्रमभैया शिंदे, श्री. संदीप कदम, मुख्याध्यापिका सौ. सरिता शिवाजीराव पतंगे, प्रभारी प्राचार्या श्रीमती कातोरे संध्या आणि पर्यवेक्षिका श्रीमती शामल शिंदे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
प्रतिमेचे पूजन व पुस्तक वाटप
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून झाली. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शासनाच्या योजनेअंतर्गत उपस्थित विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. नवी पुस्तके हातात पडताच विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता.
मान्यवरांचे मार्गदर्शन व कौतुक
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. सरिता शिवाजीराव पतंगे यांनी केले. त्यांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडत नवागत विद्यार्थिनींचे स्वागत केले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना उपमुख्याधिकारी श्री. ओम जाधव साहेब यांनी विद्यालयाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आणि शिस्तीचे भरभरून कौतुक केले. मुलींच्या शिक्षणासाठी शाळा घेत असलेले परिश्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. यासोबतच गटशिक्षणाधिकारी श्री. सतीश कास्टे, माजी गटशिक्षणाधिकारी श्री. तानाजीराव भोसले आणि श्री. मिटकर एल्लाप्पा यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थिनींना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत मोलाचे मार्गदर्शन केले.
मान्यवरांची उपस्थिती आणि परिश्रम
या सोहळ्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. मसारे, डॉ. बोखारे, तसेच श्री. जोगदंड, श्री. विलासराव भोसले, श्री. कदम यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अत्यंत नेटके सूत्रसंचालन श्री. जऊळकर ए.एन. यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्री. पठाडे यांनी मानले. हा प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने विशेष परिश्रम घेतले.- छाया: नागेश चव्हाण, वसमत.



