सिकलीगर शिख समाजावरील अन्याय आणि पोलिसांचा छळ थांबवा; ‘खालसा सिकलीगर सिख विकास प्रतिष्ठान’ची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
मुंबई :विशेष प्रतिनिधी

सिकलीगर शिख समाजावरील अन्याय आणि पोलिसांचा छळ थांबवा; ‘खालसा सिकलीगर सिख विकास प्रतिष्ठान’ची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
मुंबई / (विशेष प्रतिनिधी):
देशाच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी ऐतिहासिक योगदान देणाऱ्या ‘सिकलीगर शिख समाजा’ला आजही महाराष्ट्रात संशयाच्या नजरेने पाहिले जात असून, पोलीस प्रशासनाकडून निष्पाप समाजबांधवांचा छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप ‘खालसा सिकलीगर सिख विकास प्रतिष्ठान’ (महाराष्ट्र राज्य) चे अध्यक्ष हरनामसिंग सुभाषसिंग चव्हाण यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी थेट महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची आणि सक्त निर्देश जारी करण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात हरनामसिंग चव्हाण यांनी समाजाची व्यथा मांडताना खालील प्रमुख मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे:
१. ऐतिहासिक वारसा की गुन्हेगारी?
सिकलीगर शिख समाज हा मूळचा शस्त्रनिर्मिती करणारा आणि शौर्याचा इतिहास असलेला समाज आहे. मुघल आक्रमकांविरुद्ध लढताना आणि हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी श्री गुरु गोविंद सिंग जी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून या समाजाने शस्त्रे बनवून देशासाठी युद्धे लढली आहेत. हा आमचा गौरवशाली इतिहास असताना, आज याच वारशामुळे समाजाला गुन्हेगार ठरवले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
२. धार्मिक भावना आणि पूर्वजांच्या निशाण्यांवर गदा
शिख धर्मात शस्त्राला पूजनीय मानले गेले आहे. आजही सिकलीगर समाजाच्या घरांमध्ये आणि गुरुघरांमध्ये (गुरुद्वारा) पूजेसाठी व पूर्वजांची आठवण म्हणून पारंपरिक शस्त्रे (कृपाण, तलवार) ठेवली जातात. मात्र, पोलीस प्रशासन या धार्मिक भावनांचा आदर न करता, थेट घरात घुसून ही पूजनीय शस्त्रे बळजबरीने जप्त करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.
३. पोलिसांची सरसकट आणि पूर्वग्रहदूषित कारवाई
परिसरात कुठेही अनुचित प्रकार घडल्यास पोलीस प्रशासन सर्वात आधी पूर्वग्रहातून सिकलीगर समाजाकडे संशयाने पाहते. कोणतीही सखोल चौकशी न करता निष्पाप तरुणांना पोलीस ठाण्यात उचलून आणले जाते आणि त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या जातात. यामुळे समाजातील तरुणांचे भविष्य आणि शिक्षण उद्ध्वस्त होत असून संपूर्ण समाजात भीतीचे व अस्वस्थतेचे वातावरण आहे.
प्रतिष्ठानच्या मुख्यमंत्र्यांकडे प्रमुख मागण्या:
पोलीस प्रशासनाला कडक निर्देश: केवळ संशयाच्या आधारावर किंवा पूर्वग्रहातून सिकलीगर समाजातील निष्पाप नागरिकांवर सरसकट आणि अन्यायकारक कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश सर्व पोलीस अधीक्षकांना द्यावेत.
धार्मिक शस्त्रांना संरक्षण: गुरुघरात किंवा घरात पूजेसाठी ठेवलेली पारंपरिक शस्त्रे ही धार्मिक आस्थेचा भाग असल्याने, ती जप्त करून गुन्हे दाखल करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी विशेष नियमावली (Guidelines) तयार करण्यात यावी.
पुनर्वसन आणि मुख्य प्रवाहात आणणे: सिकलीगर समाजाच्या पारंपरिक कौशल्याचा आदर करून, त्यांच्यासाठी विशेष रोजगार, शिक्षण आणि उद्योग योजना सुरू करून समाजाला आर्थिक व सामाजिक मुख्य प्रवाहात आणण्यात यावे.
“ज्या समाजाने देशाच्या रक्षणासाठी शस्त्रे उचलली, आज त्याच समाजाला केवळ शस्त्रांच्या वारशामुळे गुन्हेगार ठरवले जात आहे, हा घोर अन्याय आहे. मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असून ते या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन सिकलीगर शिख समाजाला नक्कीच न्याय मिळवून देतील, असा विश्वास आम्हाला आहे.”
—हरनामसिंग सुभाषसिंग चव्हाण (अध्यक्ष, खालसा सिकलीगर सिख विकास प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य)



