आपला जिल्हाक्राईम स्टोरीमहाराष्ट्र

बनावट कागदपत्रांच्या आधारे अतिक्रमणाचा प्रयत्न; हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

कार्यकारी संपादक प्रवीण वाघमारे

वसमत / प्रविण वाघमारे -का.संपादक

वसमत नगर परिषद हद्दीतील सर्व्हे नं. १८० मधील नगर परिषदेच्या मालकीच्या जागेवर (म्यु. घर क्र. ए/५०५) बनावट कागदपत्रे तयार करून खरेदीखत नोंदवल्याचा आणि नगर परिषदेच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करून सदर जागेचे नामंतरण न करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व्हे नं. १८० मधील ही जागा नगर परिषदेच्या मालकीची आहे. परंतु, काही घटकांकडून या जागेचे बनावट कागदपत्रे तयार करून खरेदीखत नोंदवण्यात आले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच नगर परिषदेच्या मालकीचा आठवडी बाजार, त्यास लागून असलेली ओपन स्पेस, जनता मार्केट आणि लाकडी मशीनच्या बाजूला असलेल्या नगर परिषदेच्या मोकळ्या जागेवर काही जणांकडून तारेचे कुंपण घालून ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या गंभीर बाबीची दखल घेत लोकप्रतिनिधींनी ५ ऑगस्ट २०२६ रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात रीतसर निवेदन सादर केले. बनावट खरेदीखताच्या आधारे या मिळकतीचे कोणाच्याही नावे नामांतर करू नये, असे स्पष्ट निर्देश वसमत नगर परिषदेला देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याशिवाय नगर परिषदेच्या जागेवर टाकण्यात आलेले तारेचे अवैध कुंपण तात्काळ काढून टाकून ती जागा नगर परिषदेने पूर्णपणे ताब्यात घ्यावी, असे आदेश द्यावेत अशी विनंतीही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
निवेदन देणारे लोकप्रतिनिधी:
सौ. रुखमिनी संजय भोसले (गट नेता), प्रभाकर चंद्रभान क्षिरसागर (सदस्य), राजेश लक्ष्मणराव पवार (सदस्य), शेख मोहम्मद कामरान शेख युनुस (सदस्य), डॉ. रेणुका गजानन पतंगे (सदस्य) आणि सौ. शकुंतला गोपाळसा सातपुते (सदस्य).
नगर परिषदेच्या मौल्यवान जागेवरील या अतिक्रमाणाच्या प्रयत्नामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, आता जिल्हाधिकारी यावर काय पावले उचलतात याकडे वसमतवासीयांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!