नांदेडमधील इंदरजितसिंघ बावरी हत्याकांड: CBI चौकशी व ‘मकोका’च्या मागणीसाठी शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट; फडणवीसांचे कठोर कारवाईचे आश्वासन!
नांदेड / विशेष प्रतिनिधि
नांदेड येथील २५ वर्षीय तरुण इंदरजितसिंघ बावरी याच्या निर्घृण हत्याकांडाचे पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहेत. या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर ‘खालसा सिकलीगर सिख विकास प्रतिष्ठान’च्या शिष्टमंडळाने मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व मागण्यांचे निवेदन सादर केले.
या प्रकरणामागील भू-माफिया आणि संघटित गुन्हेगारांचे षड्यंत्र उघडकीस आणण्यासाठी संपूर्ण प्रकरणाची CBI (केंद्रीय अन्वेषण विभाग) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी शिष्टमंडळाने केली. यासोबतच आरोपींवर ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करणे, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना फाशीची शिक्षा देणे आणि नांदेडमधील गँगवार कायमचे रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवणे, या प्रमुख मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या.
यावर अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या प्रकरणात दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, कोणीही सुटणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा.” तसेच सिकलीगर सिख समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध असून पीडित कुटुंबाला लवकरच योग्य न्याय दिला जाईल, असा शब्दही त्यांनी दिला.
सिकलीगर समाजासाठी स्वतंत्र बजेट व महामंडळाची मागणी मान्य!
या बैठकीत केवळ हत्याकांडाच्या तपासाबाबतच नव्हे, तर सिकलीगर सिख समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ऐतिहासिक काळापासून देश आणि धर्माच्या संरक्षणासाठी सिकलीगर समाजाने मोठे योगदान दिले आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी
अभ्यास समितीची स्थापना सिकलीगर समाजाच्या समस्या समजून घेण्यासाठी तातडीने अभ्यास समिती स्थापन केली जाईल.
स्वतंत्र बजेट व महामंडळ समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र बजेट आणि विशेष महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवत ती लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
हरणामसिंग चव्हाण, तेजा सिंग बावरी यांच्या प्रयत्नांना मोठे यश
या महत्त्वाच्या भेटीप्रसंगी ‘खालसा सिकलीगर सिख विकास प्रतिष्ठान’चे अध्यक्ष हरणामसिंग चव्हाण, महाराष्ट्र सिकलीगर सिख समाज संस्थेचे अध्यक्ष तेगा सिंग बावरी व डॉ. बाचूसिंग टाक उपस्थित होते. मार्गदर्शक बाबा हरणामसिंगजी दमदमी टकसाल यांच्या मार्गदर्शनाखाली बेठक पार पडली.
हरणामसिंग चव्हाण यांनी सातत्याने घेतलेल्या पुढाकारामुळे आणि दिलेल्या लढाऊ नेतृत्वामुळेच थेट मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत कारवाईचे व समाजकल्याणकारी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे आता इंदरजितसिंघ बावरी याच्या कुटुंबाला न्याय मिळण्याची आणि सिकलीगर समाजाचा मुख्य प्रवाहात समावेश होण्याची आशा निर्माण झाली आहे.
Back to top button
Don`t copy text!