वसमत आगार प्रमुखांसह कर्मचाऱ्याला निलंबित करा; प्रादेशिक व्यवस्थापकांकडे ‘अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती’ची मागणी
संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमत आगार प्रमुखांसह कर्मचाऱ्याला निलंबित करा; प्रादेशिक व्यवस्थापकांकडे ‘अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती’ची मागणी
वसमत CT NEWS
वसमत बसस्थानकाच्या तात्पुरत्या प्रवासी निवाऱ्यात (हिरकणी कक्ष) अनधिकृतपणे NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) केंद्र चालवून प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्यांना पाठिशी घालणारे वसमतचे आगार प्रमुख किशन कऱ्हाळे आणि संबंधित कर्मचारी शिवचंद्र पत्रकर यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी जोरदार मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद खरे यांनी प्रादेशिक व्यवस्थापक (छत्रपती संभाजीनगर) यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. बेकायदेशीर केंद्र आणि प्रवाशांची लूट
वसमत आगारात बॉडी फिटर (सहाय्यक कारागीर) म्हणून कार्यरत असलेले शिवचंद्र पत्रकर यांच्या पत्नीच्या नावे NCMC प्रवासी कार्डचा आयडी (क्रमांक: ko 000011753) आहे. मागील चार महिन्यांपासून या नोंदणी केंद्रधारकांनी वसमत बसस्थानकातील तात्पुरत्या उभारलेल्या प्रवासी निवाऱ्यात (हिरकणी कक्षात) चक्क डिजिटल बोर्ड लावून अनधिकृतपणे कार्ड काढणे सुरू केले आहे. प्रति कार्ड ठरवून दिलेल्या दरापेक्षा ५० ते १०० रुपये जादा आकारून नागरिकांची उघड लूट केली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नाही.
ड्युटी सोडून पतीचा केंद्रावर मुक्काम; गुंडगिरीचा वापर
संबंधित आयडी धारक महिलेचे पती शिवचंद्र पत्रकर हे स्थानिक रहिवासी असून, त्यांचे राजकीय हितसंबंध आहेत. याचाच गैरफायदा घेत ते कार्यालयीन वेळेत स्वतःचे कर्तव्य न बजावता पत्नीच्या केंद्रावर पूर्णवेळ थांबत असतात. या संपूर्ण बेकायदेशीर प्रकरणात आगार प्रमुख किशन कऱ्हाळे हे त्यांना पूर्ण सहकार्य करत असून, यामध्ये मोठे आर्थिक हितसंबंध जोपासले जात असल्याचे चित्र आहे. कऱ्हाळे आणि पत्रकर यांचा पूर्वेतिहासही वादग्रस्त राहिला असून, वसमत आगारात रुजू झाल्यापासून त्यांची मनमानी, हुकूमशाही आणि कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.
प्रवाशांची कोंडी आणि बालकामगाराचा वापर
सध्या वसमत बसस्थानकाचे काम सुरू असल्याने जुनी इमारत पाडण्यात आली आहे. पत्राच्या शेडमध्ये तात्पुरती प्रवासी निवाऱ्याची सोय केली आहे. सध्या उन्हाचा पारा ४० अंशाच्या वर गेला असून, प्रवाशांना थांबायला पुरेशी जागा नाही. जेमतेम ५० ते ६० प्रवासी मावतील अशा जागेत या बेकायदेशीर कार्ड केंद्राचे ५० हून अधिक गिराईक गर्दी करून असतात. त्यातच ‘वसमत सिटी न्यूज’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, कार्ड वाटपासाठी १२ ते १३ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीला (बालकामगार) बसवले जात असल्याचे छायाचित्रासह समोर आले आहे.
पुरावे गोळा करणाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांची धमकी
या आर्थिक लुटीचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केल्यास नागरिकांना अरेरावीची भाषा वापरून अंगावर धावून जाणे आणि धमक्या देणे असे प्रकार घडत आहेत. तसेच तक्रारकर्त्यांना ‘महिला’ असल्याचा गैरफायदा घेऊन गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. यामुळे बसस्थानक परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
…तर आमरण उपोषण करणार!
या गंभीर प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी विभागीय नियंत्रक कार्यालय परभणी तसेच परिवहन मंत्र्यांकडे दाद मागण्यात आली होती. यावर दिनांक १७/०४/२०२६ रोजी परिवहन मंत्र्यांच्या पत्राचा संदर्भ देऊन महाव्यवस्थापकांनी (वाहतूक) कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, संबंधित अधिकारी झोपेचे सोंग घेऊन वेळकाढूपणा करत असून, दोषींना पाठीशी घालत असल्याचा आरोप आनंद खरे यांनी केला आहे.
“तात्काळ संबंधित NCMC कार्ड आयडी कायमचा बंद करण्यात यावा, कर्तव्यचुकार कर्मचारी शिवचंद्र पत्रकर आणि त्यांना अभय देणारे आगार प्रमुख किशन कऱ्हाळे यांना निलंबित करावे, तसेच या प्रकरणी विभागीय नियंत्रकांचीही चौकशी व्हावी. योग्य कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल,” असा इशारा आनंद खरे यांनी दिला आहे.



