एसटीचा ‘धक्का’ प्रवास! भरउन्हात प्रवाशांनी मारला बसला धक्का; वसमत येथील धक्कादायक प्रकार
वसमत:हरनामसिंग चव्हाण
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (ST) ‘लाल परी’ सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, याच लाल परीच्या दुरवस्थेचा प्रत्यय आज वसमत येथे आला. भररस्त्यात एसटी बस अचानक बंद पडल्याने चक्क ज्येष्ठ प्रवाशांना बसला धक्का मारण्याची वेळ आली. ऐन उन्हाळ्यात ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेल्या या कष्टाचा व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
नेमकी घटना काय
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी वसमत येथील आसेगाव कॉर्नर चौरस्त्यावर एसटी बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती अचानक बंद पडली. गजबजलेल्या चौरस्त्यावर बस उभी राहिल्याने काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. कडक ऊन आणि वाहतूक जाम यामुळे प्रवाशांचे हाल होत होते.
ज्येष्ठ प्रवाशांचे हाल
बस सुरू होत नसल्याने अखेर बसमधील प्रवाशांनीच पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. घामाघूम होऊन हे वयोवृद्ध प्रवासी बसला पाठीमागे ढकलत असतानाचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी चालक स्टेरिंगवर बसून होता, तर वाहक (कंडक्टर) प्रवाशांना बस कशी ढकलायची याचे मार्गदर्शन करताना दिसून येत होते.
प्रशासनाविरुद्ध संताप
“एवढ्या उन्हात आणि वयोवृद्ध असताना प्रवाशांना गाडी ढकलायला लावणे कितपत योग्य आहे?” असा संतप्त सवाल प्रत्यक्षदर्शींनी उपस्थित केला आहे. एसटी महामंडळाच्या गाड्यांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा बिघडलेल्या गाड्या प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बसच्या देखभालीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.