वसमत (संपादक ):हरनामसिंग चव्हाण
राज्याच्या राजकारणात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर, अजितदादा पवार यांनी वसमत मतदारसंघातील जनतेला जाहीर सभांमधून वारंवार दिलेला शब्द आता पूर्ण होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. “राजूला मंत्री करणार,” या अजितदादांच्या शब्दाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनीत्राताई पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते किती मान देतात, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट नेतृत्व
आमदार राजूभैया नवघरे यांनी आपल्या कामाच्या जोरावर केवळ वसमत मतदारसंघातच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांची कामाची पद्धत, सामान्यांच्या प्रश्नांची जाण आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा खुद्द अजितदादांना नेहमीच भावली आहे. अनेक सभांमध्ये दादांनी राजूभैयांच्या कार्याचे कौतुक करत, “राजूचे कार्य केवळ मतदारसंघापुरते मर्यादित न ठेवता, त्यांना मोठी जबाबदारी देऊ,” असे आश्वासन मतदारांना दिले होते.
मतदारसंघात चर्चेला उधाण
लवकरच मंत्रिमंडळ फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरू होताच, वसमतमध्ये पुन्हा एकदा ‘दादांच्या शब्दा’ची आठवण करून दिली जात आहे.
“अजितदादा आपल्या शब्दाचे पक्के आहेत, त्यामुळे यावेळी राजूभैयांना संधी मिळणारच,” असा विश्वास त्यांचे समर्थक आणि मतदारसंघातील नागरिक व्यक्त करत आहेत.
राजूभैया नवघरे यांची अजितदादांवरील निष्ठा आणि पक्षासाठी दिलेले योगदान पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा सुनीत्राताई पवार त्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करतील का, हा कळीचा मुद्दा ठरला आहे.
विश्वासू चेहऱ्याला संधी मिळणार?
राजूभैया नवघरे हे अजितदादांच्या अत्यंत विश्वासू आमदारांपैकी एक मानले जातात. मतदारसंघातील विकासकामांचा डोंगर आणि दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. मंत्रिमंडळ विस्तारात नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचे धोरण राबवल्यास, नवघरे यांचे नाव अग्रक्रमाने समोर येण्याची शक्यता आहे.
आता चेंडू राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या दरबारात असून, वसमतला लाल दिवा मिळणार की पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार, हे येणारा काळच ठरवेल.
Back to top button
Don`t copy text!