दिला इशारा! वसमत मार्गावरील ‘आडगाव’ पेटणार; २० जूनपासून महावितरण कार्यालयाबाहेर आमरण उपोषण!
संपादक हरनामसिंग चव्हाण

दिला इशारा! वसमत मार्गावरील ‘आडगाव’ पेटणार; २० जूनपासून महावितरण कार्यालयाबाहेर आमरण उपोषण!
वसमत (संपादक हरनामसिंग चव्हाण ):
शासकीय अनास्था आणि महावितरणच्या (MSEB) ढिसाळ कारभारामुळे ग्रामीण भागातील जनतेचा अंत आता संपला आहे. वसमत तालुक्यातील आडगाव (रं.) येथील गावकऱ्यांची सहनशीलता पूर्णपणे संपली असून, गेल्या १५ दिवसांपासून खंडित असलेला वीजपुरवठा आणि प्रशासकीय दुर्लक्ष याविरोधात गावकऱ्यांनी थेट २० जून २०२६ पासून वसमत उपविभागीय कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसण्याचा कडक इशारा दिला आहे. यासंदर्भात महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना आज जाहीर निवेदन देण्यात आले.
१५ दिवसांपासून अंधार; पिके करपली, लहान मुले-वृद्ध हैराण!
आडगाव (रं.) शिवारातील आणि गावठाणचा वीजपुरवठा गेल्या १५ दिवसांपासून पूर्णपणे ठप्प आहे. सध्या पेरणीचे दिवस असून शेतीसाठी पाणी उपलब्ध असतानाही केवळ विजेअभावी शेतकऱ्यांनी पेरलेली पिके धोक्यात आली आहेत. आधीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सोसणाऱ्या बळीराजावर आता महावितरणमुळे ‘सुलतानी’ संकट ओढवले आहे.
केवळ शेतीच नाही, तर विजेअभावी गावातील पिण्याच्या पाण्याची योजना कोलमडली आहे. शाळकरी मुलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. भर उन्हाळ्यात-पावसाळ्यात गावातील वयोवृद्ध, आजारी व्यक्ती आणि निष्पाप लहान मुलांना या अंधाराचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
लाईनमनची बदली, चार्ज कुणाकडेच नाही!
या भीषण समस्येमागचे मुख्य कारण म्हणजे महावितरणचा नियोजनशून्य कारभार! आडगावसाठी नियुक्त असलेले तंत्रज्ञ (लाईनमन) श्री. रणगाडे यांची बदली झाल्यापासून या फीडरचा चार्ज अद्याप कोणत्याही दुसऱ्या कर्मचाऱ्याला देण्यात आलेला नाही. त्यामुळे गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, दुरुस्तीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.
गावकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
१) आडगाव (रं.) येथील वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्यात यावा.
२) गावासाठी तत्काळ नवीन तंत्रज्ञ (लाईनमन) नियुक्त करावा.
३) गावात चार महत्त्वाच्या ठिकाणी ‘एबी स्वीच’ (AB Switch) बसवण्यात यावे.
आता थेट ‘आरपारची’ लढाई!
या पत्रावर ग्रामपंचायत प्रशासक तथा ग्रामसेवक यांच्यासह गावातील प्रमुख नागरिक विठ्ठल माणिकराव चव्हाण, पंढरी रामराव चव्हाण, शंकर किसनराव चव्हाण, शिवाजी साहेबराव चव्हाण, इंद्रजीत रामरावजी चव्हाण, गंगाधर व्यंकटराव चव्हाण यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी स्वाक्षऱ्या करून प्रशासनाचा निषेध केला आहे.
“जर २० जूनपर्यंत आमच्या न्याय्य मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर महावितरण कार्यालयाबाहेर आम्ही गावकऱ्यांसह आमरण उपोषणाला बसणार. त्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीला महावितरण प्रशासनच जबाबदार राहील!” अशी संतप्त प्रतिक्रिया आडगावच्या ग्रामस्थांनी दिली आहे.
आता या गंभीर समस्येवर महावितरणचे अधिकारी झोपेतून जागे होऊन तत्काळ कारवाई करतात की गावकऱ्यांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



