हिंगोली पोलिसांची मोठी कारवाई! रस्त्यात अडवून हत्याराच्या धाकाने चोऱ्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश २ आरोपी जेरबंद, ४ गुन्हे उघडकीस
वसमत/ रामु चव्हाण
रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना अडवून, हत्यारांचा धाक दाखवून मोबाईल आणि रोख रक्कम जबरीने लुटणाऱ्या एका सराईत टोळीचा हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या टोळीतील दोन प्रमुख आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून तब्बल २ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील जबरी चोरीचे एकूण ४ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी
गत काही दिवसांपूर्वी (दि. १०/११/२०२५ ते ११/०१/२०२६ दरम्यानच्या रात्री) मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरांनी कुरूंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भेंडेगाव रेल्वे गेटजवळ, औंढा येथील विक्रम हॉटेल परिसर, हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एरंडेश्वर ते दारेफळ रोड, तसेच नांदेड जिल्ह्यातील उस्माननगर भागात प्रवाशांना रस्त्यात गाठले होते. चोरांनी धारदार हत्यारांचा धाक दाखवून लोकांचे मोबाईल आणि रोकड जबरीने चोरून नेली होती. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाने लावला छडा
या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. डॉ. नीलाभ रोहन आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. कमलेश मीना यांनी घटनास्थळांना भेटी दिल्या होत्या. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. मोहन भोसले यांना तात्काळ गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पो.उप.नि. माधव जिव्हारे व त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, पोलिसांनी सापळा रचून दि. १५/०५/२०२६ रोजी मौ. चौंडी येथून दोन आरोपींना ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेले आरोपी:
१. किसन रमेश सूर्यवंशी (वय २४ वर्षे, रा. शिव नगर, नांदेड)
२. आदित्य उर्फ आद्या शिवाजी जाधव (वय २० वर्षे, रा. खोब्रागडे गल्ली नंबर २, नांदेड)
पोलिसांनी या दोघांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी आपल्या इतर ४ साथीदारांच्या मदतीने हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हे जबरी चोऱ्यांचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे:
०७ महागडे मोबाईल (सॅमसंग, विवो, पोको, मोटोरोला, ओप्पो कंपन्यांचे)
एक पल्सर मोटारसायकल (गुन्ह्यात वापरलेली)
एक खंजीर (धमकावण्यासाठी वापरलेले घातक हत्यार)
👉 एकूण जप्त मुद्देमाल ₹ २,४३,५००/- (दोन लाख तेहेचाळीस हजार पाचशे रुपये)
या कारवाईमुळे दोन्ही जिल्ह्यातील एकूण ४ गुन्ह्यांची उकल झाली असून, टोळीतील उर्वरित फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
कामगिरी करणारे पोलीस पथक
ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक श्री. कमलेश मीना, पो.नि. श्री. मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. माधव जिव्हारे, पोलीस अंमलदार सुभाष चव्हाण, कोंडीबा मगरे, सतीश जाधव, विक्रम कुंदनानी, आजम प्यारेवाले, विशाल खंडागळे, किशोर सावंत, दत्ता नागरे आणि मारोती काकडे यांच्या पथकाने अत्यंत चातुर्याने पार पाडली. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.