कृत्रिमरित्या इंधन टंचाई निर्माण केल्यास कठोर कारवाई: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश
संपादक हरनामसिंग चव्हाण

- कृत्रिमरित्या इंधन टंचाई निर्माण केल्यास कठोर कारवाई: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश
वसमत CT NEWS (संपादक हरनामसिंग चव्हाण )
हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी सर्व पेट्रोल पंप चालकांनी काळजी घ्यावी. कोणीही कृत्रिमरित्या इंधनटंचाई निर्माण करण्याचा किंवा डिझेलचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील इंधन संकट आणि शेतकऱ्यांना डिझेल मिळण्यात येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालक आणि विविध पेट्रोलियम कंपन्यांचे विक्री अधिकारी उपस्थित होते.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे आणि जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश:
काळाबाजारावर निर्बंध जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल साठ्याचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, इंधनाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
इंधन वितरणावर मर्यादा वाहनधारकांना निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त इंधन देऊ नये, तसेच विना क्रमांकाच्या (No Plate) वाहनांना डिझेल पुरवठा करू नये, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
अत्यावश्यक सेवांना प्राधान्य रुग्णालये, बँका आणि इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना वेळेत इंधन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पंप चालकांची असेल.
प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन पेट्रोल-डिझेल पुरवठ्याबाबत कोणाकडून दबाव टाकला जात असल्यास किंवा कंपन्यांना अनामत रक्कम भरूनही वेळेत पुरवठा होत नसल्यास, पंप चालकांनी याची माहिती तात्काळ
प्रशासनाला द्यावी.
“या संकटकाळात सर्वांनी जबाबदारीने वागून प्रशासनाला सहकार्य करावे आणि देशाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.”— राहुल गुप्ता, जिल्हाधिकारी, हिंगोली



