खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोलीच्या आयुष रुग्णालय,मॉडेल कॉलेजच्या जागेचा प्रश्न लावला मार्गी
मंत्री सुनील केदार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भूसंपादनास मंजुरी
हिंगोली : रामु चव्हाण
हिंगोली येथे मंजूर झालेले आयुष रुग्णालय आणि मॉडेल कॉलेजच्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागला आहे . राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्यासोबत आज ( दि. ७ ) मुंबई येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. खासदार हेमंत पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे . ५० खाटांच्या आयुष रुग्णालयासाठी १५ एकर आणि मॉडेल कॉलेज करिता १० एकर जमीन देण्यास तात्काळ मंजुरी दिली आहे .
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिंगोली जिल्ह्याकरिता ५० खाटांचे आयुष रुग्णालय आणि मॉडेल कॉलेज खासदार हेमंत पाटील यांनी केंद्र आणि राज्यसरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजूर होऊन बरेच दिवस झाले होते. परंतु यास जमीन उपलब्ध नसल्यामुळे प्रलंबित असलेले काम खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्यासोबत आज (दि. ७ ) रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत, हा प्रश्न तात्काळ मार्गी लावून मंजुरी मिळवून घेतली . मंत्री सुनील केदार यांनी सुद्धा या दोन्ही प्रकल्पाना सकारात्मक प्रतिसाद देऊन मंजुरी दिली . या दोन्ही प्रकल्पामुळे हिंगोली जिल्ह्यात सुसज्ज असे आयुष रुग्णालय आणि विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची गैरसोय दूर होऊन सुसज्ज मॉडेल कॉलेज उपलब्ध होणार आहे. हिंगोली जिल्हा हा आदिवासी बहुल असल्याने जिल्ह्यातील आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना आयुष रुग्णालय आणि मॉडेल कॉलेजचा मोठा फायदा होणार आहे. याबाबतचा रीतसर प्रस्ताव जिल्हाधिकारी हिंगोली यांच्यामार्फत यापूर्वीच पशुसंवर्धन विभागाकडे पाठवून देण्यात आला होता. त्यावर उचित कारवाई करत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला . हिंगोली लोकसभा मतदार संघाची आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राची बाब लक्षात घेता हे दोन्ही प्रकल्प महत्वपूर्ण असल्याचे खासदार हेमंत पाटील म्हणाले .५० खाटांच्या आयुष रुग्णालयासाठी १५ एकर आणि मॉडेल कॉलेज करिता १० एकर अशी एकूण २५ एकर जमीन तात्काळ उपलब्ध करून दिली असून लवकरच त्या ठिकाणी बांधकामास सुरवात होईल असे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले .