तत्कालीन सपोनि रूपाली कांबळे यांच्या तपासाने आरोपीला सश्रम कारावास
कंधार जिल्हा न्यायालयाचा निर्णय
वसमत / रामु चव्हाण
पोलीस ठाणे सोनखेडच्या हद्दीत राहणाऱ्या चार वर्षीय बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरात बोलावून अत्याचार करणाऱ्या नराधमाला कंधार येथील जिल्हा न्यायाधीशांनी 20 वर्ष सक्तमजुरी व 6 हजार रुपये रोख दंड, दंड न भरल्यास 11 महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
दि. 11 एप्रिल 2022 रोजी एक चार वर्षीय बालिका आपल्या गावात उमराच्या झाडाखाली आपल्या लहान भावासोबत खेळत असतांना नरबा कांबळे नावाच्या माणसाने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले. तिच्यावर शारीरिक अत्याचार करून तिला मारहाण केली.
या प्रकरणाची तक्रार बालिकेच्या वडीलांनी सोनखेड पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा क्रमांक 63/2022 दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली कांबळे यांच्याकडे देण्यात आला.
रुपाली कांबळे यांनी बालिकेवर अत्याचार करणारा नराधम नरबा कांबळे यास अटक केली आणि तपास पुर्ण करून कंधार न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. कंधार न्यायालयात हा विशेष सत्र खटला क्रमांक 24/2022 पहिले जिल्हा न्यायाधीश कंधार यांच्याकडे चालला. या प्रकरणात 11 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. न्यायालयासमोर आलेला वैद्यकीय पुरावा, इतर साक्षीदार आणि सरकारी वकील ऍड. शैलजा पाटील यांनी मांडलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन कंधारचे पहिले जिल्हा न्यायाधीशांनी नरबा कांबळेला 20 वर्ष सक्तमजुरी आणि 6 हजार रुपये रोख दंड, दंड न भरल्यास 11 महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सोनखेडचे सहाय्यक फपोलीस निरिक्षक पांडूरंग माने यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस अंमलदार जे. आर. सांगवीकर यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पुर्ण केले.तत्कालानी सपोनि रूपाली कांबळे यांनी अतिशय बारकाईने या प्रकरणात तपास करून पुरावे साक्षीदार,आरोपी विरूद्ध भक्कम पुरावे मा.न्यायालय समोर मांडल्याने मा.न्यायालयाने नराधम नयबा कांबळे यास 20 वर्ष कारावास सुनवला.