जिल्हा बँक निवडणूक टोकाई सहकारी साखर कारखान्यातर्फे यादवराव इंगोले यांच्या नावाचा ठराव मंजूर
वसमत / हरनामसिंग चव्हाण
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, टोकाई सहकारी साखर कारखाना लि., कुरुंदा (ता. वसमत) येथे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कारखान्याच्या वतीने आगामी निवडणुकीसाठी यादवराव किशनराव इंगोले यांच्या नावाचा प्रतिनिधी म्हणून ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे.
साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सहकारी सभासदांनी यादवराव इंगोले यांच्या नेतृत्वावर आणि अनुभवावर विश्वास दाखवत हा ठराव संमत केला. या निर्णयामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत टोकाई कारखान्याची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निवडीनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना टोकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा भाजप उपतालुका अध्यक्ष शिवाजी यादवराव इंगोले म्हणाले की, “कारखान्याच्या सहकारी सभासदांनी यादवरावजींवर जो विश्वास दाखवला आहे, तो अत्यंत मोलाचा आणि स्मरणीय आहे. हा विश्वास आगामी काळात जिल्ह्याच्या सहकारी चळवळीला अधिक बळकटी देण्यासाठी कारणीभूत ठरेल. मी सर्व सभासदांचे आणि समर्थकांचे मनापासून आभार मानतो.”
या ठरावामुळे इंगोले समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सहकार क्षेत्रात या निर्णयाची मोठी चर्चा होत आहे.