वसमत शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि नागरिकांच्या सुलभ प्रवासासाठी आज वसमत नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली.
कारंजा चौक ते पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशन ते झेंडा चौक या मुख्य रस्त्यांवरील सर्व कच्ची व पक्की अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले.
प्रशासकीय फौजफाटा मैदानात
या मोहिमेदरम्यान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कंकर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. वाघ साहेब यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस दलाचा मोठा ताफा उपस्थित होता.
कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वाहतूक कोंडीतून सुटका
रस्त्यावर ठाण मांडून बसलेले भाजीपाला विक्रेते, हातगाडीवरील फळ विक्रेते आणि अनधिकृत टपऱ्यांमुळे या मार्गावर सतत वाहतुकीची कोंडी होत होती.
याचा मोठा त्रास वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागत होता.
आजच्या कारवाईमुळे हा रस्ता पूर्णपणे मोकळा झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
‘कायमस्वरूपी पर्यायी जागे’ची चर्चा जोरात
एकीकडे अतिक्रमण हटवल्याने रस्ते मोकळे झाले असले, तरी हातावर पोट असलेल्या गरिबांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
“पोटाची खळगी भरण्यासाठी आणि दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आम्ही रस्त्यावर दुकान मांडतो,” अशी भावना विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर, नगरपरिषदेने या फळ आणि भाजी विक्रेत्यांना कायमस्वरूपी हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आता शहरात जोर धरत आहे.
जर प्रशासनाने हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली, तर भविष्यात रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही आणि या कष्टकऱ्यांचा रोजगारही सुरक्षित राहील, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
“रस्ते मोकळे होणे शहरासाठी गरजेचे आहेच, पण गरीब विक्रेत्यांना पर्यायी जागा देऊन प्रशासनाने त्यांच्या पोटाचा प्रश्नही मार्गी लावावा, तरच ही मोहीम खऱ्या अर्थाने यशस्वी होईल.”
सुरेश धोत्रे स्थानिक नागरिक
आता नगरपरिषद प्रशासन या विक्रेत्यांसाठी लवकरच कायमस्वरूपी मार्ग काढणार का? याना पर्यायी जागा देणार का असा सवाल उपस्थित केल आहे.