हिंगोलीत शेतकऱ्यांचे मोटार पंप चोरणारी टोळी जेरबंद; एलसीबीची धडक कारवाई, २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त
मुख्य संपादक रामु चव्हाण

हिंगोली / वसमत / रामु चव्हाण
जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांचे शेतातील मोटार पंप चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. या चोऱ्यांमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत शिताफीने एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ गुन्हे उघडकीस आणले असून, २ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर शोधमोहीम तीव्र
आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटार पंप चोरीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर, या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे विशेष आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि माधव जिव्हारे व त्यांच्या तपास पथकाने घटनास्थळांचा सखोल अभ्यास सुरू केला.
गुप्त माहितीच्या आधारे ३ आरोपींना अटक
तपास पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, मौजे शेवाळा (ता. कळमनुरी) येथे राहणाऱ्या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी एकत्र मिळून हे गुन्हे केल्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१) शेख वाजीद शेख अयुब (रा. शेवाळा)
२) शेख जिलानी शेख रब्बानी (रा. शेवाळा)
३) संजय उर्फ न्यायपाल हिरामण नरवाडे (रा. शेवाळा)
३ गुन्हे उघड, लाखोंचा मुद्देमाल जप्त
आरोपींच्या अटकेमुळे पो.स्टे. आखाडा बाळापूर येथील खालील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत:
* गु.र.नं. २५७/२०२६ (कलम ३०३(२) भा.न्या.सं.)
* गु.र.नं. २६१/२०२६ (कलम ३०३(२) भा.न्या.सं.)
* गु.र.नं. २५४/२०२६ (कलम ३०३(२) भा.न्या.सं.)
जप्त केलेला मुद्देमाल:
आरोपींकडून पोलिसांनी चोरीला गेलेले ४ मोटार पंप, ८०० फूट केबल आणि गुन्ह्यात वापरलेला एक तीन चाकी ऑटो असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या पथकाने केली कारवाई
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, पोउपनि माधव जिव्हारे, पोलीस अंमलदार भुजंग कोकणे, शिवाजी जालमिरें, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले, मुनीर प्यारेवाले, हरीभाऊ गुंजकर, ज्ञानेश्वर गोरे व शंकर हराळ सर्व ने. स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी यशस्वीपणे पार पाडली.


