आपला जिल्हासामाजिक

हिंगोली जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय; कुणबी जात प्रमाणपत्रासाठी हेल्पलाईन सुरू, नागरिकांना मिळणार थेट मार्गदर्शन

मुख्य संपादक रामू चव्हाण

हिंगोली जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय; कुणबी जात प्रमाणपत्रासाठी हेल्पलाईन सुरू, नागरिकांना मिळणार थेट मार्गदर्शन

वसमत CT NEWS
मुख्य संपादक: रामू चव्हाण

हिंगोली:
मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आणि त्यासंबंधीच्या अडचणी सोडवण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने नागरिकांच्या मदतीसाठी एक विशेष हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.
या हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरिकांना जुन्या नोंदी शोधणे, जात प्रमाणपत्र मिळवणे आणि जात पडताळणी (Validity) यांसंदर्भातील समस्यांवर थेट मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.
पुरावे नसलेल्यांसाठी प्रतिज्ञापत्राचा पर्याय
न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि शासनाच्या ताज्या निर्णयानुसार, ज्या मराठा समाजातील भूमिधारक, भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करणाऱ्या व्यक्तींकडे शेतजमिनीच्या मालकीचा पुरावा उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. अशा नागरिकांनी १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वी स्वतःचे किंवा त्यांच्या पूर्वजांचे संबंधित स्थानिक क्षेत्रात वास्तव्य असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. या प्रतिज्ञापत्रासोबत जोडलेल्या पुराव्यांची सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत स्थानिक चौकशी करून खातरजमा केली जाईल.
वंशावळ आणि नातेसंबंधांच्या आधारे तपासणी
स्थानिक चौकशीदरम्यान, संबंधित व्यक्तीच्या गावातील किंवा नातेसंबंधातील कोणाला यापूर्वी कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले असेल आणि त्यांनी ‘अर्जदार हा आमच्याच कुळातील किंवा नातेसंबंधातील असून कुणबी आहे’ असे प्रतिज्ञापत्र दिल्यास, त्याचा सकारात्मक विचार केला जाईल. गावपातळीवरील स्थानिक समिती आणि वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करून सक्षम प्राधिकारी जात प्रमाणपत्र देण्याबाबत अंतिम निर्णय घेतील.
नागरिकांच्या मदतीसाठी येथे संपर्क करा:
नागरिकांना येणाऱ्या अडचणींचे जागेवरच निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेल्पलाईन क्रमांक: 8408067158
नियुक्त अधिकारी/कर्मचारी:
१. लक्ष्मण तोटावाड (नायब तहसीलदार, सामान्य प्रशासन)
२. गजानन गाजरे (लिपिक-कम-डाटा एन्ट्री ऑपरेटर)
प्रशासनाचे आवाहन: “हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी कुणबी जात प्रमाणपत्र अथवा जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविताना काही अडचणी किंवा समस्या असल्यास, त्यांनी कार्यालयीन वेळेत ८४०८०६७१५८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.” — अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), हिंगोली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!