आपला जिल्हा

वसमत तालुक्यात भूमाफियांचा उच्छाद! ‘एनए’ जमिनीवर बेकायदेशीर पेरणी, तर शेतकऱ्यांची वाट केली बंद गावागावांतील पारांवर चर्चांना उधाण; स्थानिक प्रशासनाच्या ‘मॅनेज’ भूमिकेवर जनतेत तीव्र संताप

संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमत तालुक्यात भूमाफियांचा उच्छाद! ‘एनए’ जमिनीवर बेकायदेशीर पेरणी, तर शेतकऱ्यांची वाट केली बंद
गावागावांतील पारांवर चर्चांना उधाण; स्थानिक प्रशासनाच्या ‘मॅनेज’ भूमिकेवर जनतेत तीव्र संताप

वसमत CT NEWS संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमत (विशेष प्रतिनिधी):
वसमत शहर आणि ग्रामीण भागात सध्या भूमाफियांच्या मनमानी कारभाराने टोक गाठले असून, यावरून तालुक्यातील प्रत्येक गावाच्या पारावर आणि चावडीवर सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. एकीकडे कागदोपत्री ‘एनए’ (अकृषिक) झालेल्या जमिनींवर ट्रॅक्टर चालवून बेकायदेशीरपणे पेरणी आणि मशागत केली जात आहे, तर दुसरीकडे याच जमिनींना मोठे तार कुंपण (कंपाऊंड) घालून शेजारील मूळ शेतकऱ्यांचे पिढ्यानपिढ्यांचे वहिवाटीचे रस्ते अडवले जात आहेत.
“अजब कारभार! बिनशेती जमिनीवर पेरणी सुरू आहे, पण मूळ शेतकऱ्याला शेतात जायला वाट नाही,” असा संताप सध्या गावकरी व्यक्त करत आहेत. ऐन पावसाळ्यात मशागतीची कामे वेगात असताना रस्ते बंद झाल्यामुळे गरिबांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
स्थानिक प्रशासनावर संशयाची सुई:
तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदारांकडे वारंवार तक्रारी करूनही यंत्रणा ढिम्म असल्याने, स्थानिक अधिकारी लाच लाटून गप्प बसले आहेत की काय? अशी शंका थेट पारावर चर्चिली जात आहे. शासकीय नियमांची ऐशीतैशी करून सुरू असलेले हे बेकायदेशीर साम्राज्य नेमके कोणत्या राजकीय नेत्याच्या किंवा बड्या अधिकाऱ्याच्या ‘आशीर्वादाने’ सुरू आहे, यावरून उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
पारावरील मुख्य मागण्या आणि जनतेचा सवाल:
‘एनए’ जमिनीवर सुरू असलेली बेकायदेशीर शेती आणि कुंपणे तात्काळ तोडून रस्ते मोकळे करा.
प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या मुजोर विकासकांवर गुन्हे दाखल करा.
जनतेचा संतप्त सवाल: खालचे अधिकारी तर मॅनेज झाले, पण जिल्ह्याचे राजे (जिल्हाधिकारी) यावर स्वतःहून कडक पाऊल उचलणार की गरिबांची अशीच कोंडी होणार?
या गंभीर प्रकरणात जर वरिष्ठ पातळीवरून तात्काळ हस्तक्षेप झाला नाही, तर सर्वसामान्यांचा प्रशासनावरील विश्वास उडून जाईल, असा सूर सध्या संपूर्ण वसमत तालुक्यात उमटत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!