*जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थेला किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळाला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे – नगरसेवक सचिन दगडू यांची मागणी*
*बसमत:*
भारताचे ‘मिसाईल मॅन’ आणि ११ वे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे आजही देशातील लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत. अशा महान देशभक्त महापुरुषाचे नाव जगातील एखाद्या मोठ्या शिक्षण संस्थेला किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळाला देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा, अशी आग्रही मागणी नगरसेवक सचिन दगडू यांनी केली आहे.
*विज्ञानातील योगदान अविस्मरणीय*
यावेळी बोलताना सचिन दगडू म्हणाले की, डॉ. कलाम यांनी मद्रास येथून एरोस्पेस इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून देशाच्या संरक्षण क्षेत्रात क्रांती घडवली. ‘अग्नी’ आणि ‘पृथ्वी’ या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी केवळ विज्ञानातच नाही, तर २००२ ते २००७ या काळात भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून काम करताना या पदाची उंची वाढवली.
*सन्मान हा कार्याला साजेसा असावा*
“डॉ. कलाम हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत. जिथे शास्त्रज्ञ घडवले जातात अशा जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थेला किंवा एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देणे, हाच त्यांच्या कार्याचा खरा सन्मान ठरेल,” असे मत सचिन दगडू यांनी व्यक्त केले.
*बुद्धीचे प्रदर्शन करण्यापेक्षा कृतीवर भर द्या*
या विषयावर बोलताना त्यांनी कडक शब्दांत सुनावले की, “काही लोक केवळ प्रसिद्धीसाठी काहीही बोलून आपल्या बुद्धीचे प्रदर्शन करत असतात. परंतु, डॉ. कलाम यांच्यासारख्या महापुरुषांच्या बाबतीत बोलताना गांभीर्य असणे आवश्यक आहे. केवळ सुचवण्यासाठी काहीही सुचवू नये, तर त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत.”
या मागणीमुळे आता डॉ. कलाम यांच्या नावाने जागतिक स्तरावर एखादे मोठे पाऊल उचलले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Back to top button
Don`t copy text!