वसमतचे सुपुत्र निलेश भुजबळ यांचा पोलीस अधिक्षकांकडून विशेष गौरव
मुख्य संपादक रामु चव्हाण

परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून वसमतचे सुपुत्र निलेश भुजबळ यांचा गौरव
वसमत (प्रतिनिधी): हरनामसिंग चव्हाण
गुन्ह्याची उकल करण्यात दाखवलेले शौर्य आणि उत्कृष्ट कार्यकौशल्याबद्दल परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून वसमत येथील रहिवासी निलेश दिगंबरराव भुजबळ यांना ‘प्रशस्तीपत्र’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
नेमकी कामगिरी काय?
निलेश भुजबळ (सपोउपनि, स्थागुशा परभणी) यांनी सेलू पोलीस ठाणे हद्दीतील एका गुन्ह्याचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याकडून तब्बल ६,२०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात त्यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या या कामगिरीमुळे पोलीस विभागाची प्रतिमा उंचावली आहे.
अधीक्षकांकडून कौतुक
परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी (भा.पो.से.) यांनी या यशाबद्दल भुजबळ यांना सन्मानित केले. “आपण भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी करून आपले कार्यकौशल्य सिद्ध कराल,” अशा शब्दांत त्यांनी भुजबळ यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
निलेश भुजबळ यांच्या या यशाबद्दल वसमत शहरातून आणि पोलीस वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



