वसमत महसूल प्रशासनाचा ‘जायमोक्का’ फज्जा; शेतकऱ्यांना नोटीस देऊन अधिकारीच ‘नॉट रीचेबल’! तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली; आधी टाळाटाळ, आता कडक उन्हात शेतकऱ्यांना ताटकळत ठेवून तलाठी अन् मंडळ अधिकारी गायब!
विशेष प्रतिनिधी

वसमत महसूल प्रशासनाचा ‘जायमोक्का’ फज्जा; शेतकऱ्यांना नोटीस देऊन अधिकारीच ‘नॉट रीचेबल’!
तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली; आधी टाळाटाळ, आता कडक उन्हात शेतकऱ्यांना ताटकळत ठेवून तलाठी अन् मंडळ अधिकारी गायब!

वसमत (विशेष प्रतिनिधी):
एकिकडे शासन ‘शासन आपल्या दारी’चे ढोल बडवत असताना, दुसरीकडे मात्र वसमत तालुक्यात महसूल प्रशासनाच्या मनमानी आणि बेजबाबदार कारभारामुळे शेतकऱ्यांना मानसिक छळाला सामोरे जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मौजे कन्हेरगाव येथील रस्ता वादाप्रकरणी प्रत्यक्ष जागेवर (जायमोक्का) उपस्थित राहण्याची कायदेशीर नोटीस बजावून स्वतः तहसीलदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळेची शिस्त पाळण्याची तंबी दिली होती. मात्र, आज ४ जून २०२६ रोजी कडक उन्हात शेतकरी वेळेवर हजर राहिले, पण नोटीस बजावणारे महाभाग अधिकारी, तलाठी आणि मंडळ अधिकारी स्वतःच गायब झाले! अधिकाऱ्यांच्या या ‘नॉट रीचेबल’ भूमिकेमुळे संतप्त शेतकऱ्यांनी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात धाव घेण्याचा पवित्रा घेतला आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
मौजे कन्हेरगाव येथील गट क्र. १२३ मधील शेतकऱ्यांच्या हक्काचा पळसगाव-कन्हेरगाव हा जुना शेतरस्ता काही विघातक प्रवृत्तींनी बेकायदेशीरपणे अडवून धरला आहे. यामुळे हतबल झालेल्या हरनामसिंग सुभाषसिंग चव्हाण व इतर गावकऱ्यांनी हक्काच्या रस्त्यासाठी प्रशासनाकडे दाद मागितली होती. यावर माननीय तहसीलदार (वसमत) सागर नन्नवरे यांनी ८ एप्रिल २०२६ रोजीच गिरगावच्या महसूल मंडळ अधिकाऱ्यांना तातडीने रस्ता पाहणी व पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, संबंधित मंडळ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी न जाता तब्बल महिनाभर टाळाटाळ केली आणि थेट सुनावणीची नोटीस काढून अतिक्रमणधारकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शेतकऱ्यांनी आधीच केला होता. याविरोधात शेतकऱ्यांनी २५ मे रोजी उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे ‘स्मरणपत्र’ सादर करून दुसऱ्या निष्पक्ष अधिकाऱ्याची मागणीही केली होती.
…आणि अखेर प्रशासनाचा डाव फसला!
शेतकऱ्यांच्या वाढत्या दबावामुळे महसूल प्रशासनाने (जा.क्र. २०२६/जमा-१/कावि/ दिनांक २६/०५/२०२६) अन्वये नवीन नोटीस जारी केली. यात स्पष्ट बजावण्यात आले होते की, “दिनांक ०४/०६/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता सर्वांनी प्रत्यक्ष जायमोक्कावर (गट क्र. १२३) हजर राहावे, कोणीही गैरहजर राहणार नाही याची नोंद घ्यावी.”
तहसीलदारांच्या या कडक आदेशाचा मान राखून अर्जदार शेतकरी हरनामसिंग चव्हाण व इतर शेतकरी आपली शेतीची कामे बुडवून सकाळी ११ वाजण्यापूर्वीच कडक उन्हात शेतात गोळा झाले. मात्र, दुपार उलटून गेली तरी ना तिथे तलाठी फिरकले, ना गिरगावचे ते वादग्रस्त मंडळ अधिकारी (सर्कल) आले!
“आम्हाला कायद्याची भीती दाखवून वेळेवर बोलावले जाते. आम्ही या कडक उन्हात ताटकळत उभे राहिलो. पण ज्यांनी न्याय द्यायचा, ते सरकारी बाबूच गायब आहेत. हा शेतकऱ्यांचा उघड उघड छळ आणि थट्टा आहे,”** अशी संतप्त आणि आर्त प्रतिक्रिया उपस्थित शेतकऱ्यांनी दिली.
अधिकारी गैरहजर राहण्याचा ‘अर्थ’ काय?
ह्या संपूर्ण प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत आणि त्याचे थेट अर्थ खालीलप्रमाणे निघतात:
अतिक्रमणधारकांशी उघड संगनमत: तहसीलदारांच्या लेखी आदेशालाही न जुमानता वारंवार पाहणी टाळणे आणि ऐनवेळी गायब होणे, हे अधिकाऱ्यांचे अतिक्रमणधारकांशी असलेले आर्थिक किंवा हितसंबंधांचे उघड संगनमत दर्शवते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली: तालुक्याच्या मुख्य तहसीलदारांच्या सहीने निघालेल्या नोटीसची त्यांच्याच हाताखालच्या तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना भीती किंवा आदर राहिलेला नाही, हेच यातून सिद्ध होते.
शेतकऱ्यांना थकवून गप्प करण्याचा डाव: शेतकऱ्यांची मानसिक कोंडी करायची, त्यांना उन्हातानात चकरा मारायला लावायच्या, जेणेकरून शेतकरी कंटाळून आपला हक्क सोडतील, असा हा क्रूर प्रशासकीय डाव तर नाही ना? अशी शंका घेण्यास वाव आहे.
शेतकऱ्यांचा रोखठोक सवाल: कारवाई कोणावर होणार?
नोटीसमध्ये “कोणीही गैरहजर राहू नये” असा कडक नियम लिहिणारे महसूल प्रशासन स्वतःच्याच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या या बेजबाबदार तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर आता काय कारवाई करणार? शेतकऱ्यांना वेळेची शिस्त लावणारे वरिष्ठ अधिकारी आपल्याच खात्यातील या दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांचे निलंबन करणार का? की नेहमीप्रमाणे त्यांना पाठीशी घालणार? याकडे आता संपूर्ण वसमत तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सध्याच्या या धक्कादायक प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता थेट हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे या भ्रष्ट आणि ढिसाळ कारभाराविरोधात पुराव्यांसह तक्रार दाखल करण्याचा आणि तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आज दि, 4/6/2026 रोजी वेळ दुपारी 12:26 ला संबधित तलाटी भालेराव यांनी कॉल करून
शेतकऱ्यांना शेतातून तहसील ला या म्हणून सांगितले
पढील माहिती बातमीच्या माध्यमातून लवकरच



