एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार! प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी २९ जूनपासून वसमत आगारासह राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन
संपादक हरनामसिंग चव्हाण

एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार! प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी २९ जूनपासून वसमत आगारासह राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन
वसमत CT NEWS
वसमत:
राज्य परिवहन (MSRTC) कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या विविध आर्थिक मागण्यांची प्रशासनाकडून अद्यापही सोडवणूक न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. संयुक्त कृती समितीच्या वतीने येत्या २९ जून २०२६ पासून विभागीय कार्यालय आणि कार्यशाळांसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा वसमत आगार व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री आणि मंत्रालय प्रशासनाला २७ मे रोजीच पूर्वसूचना व नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कामगार संघटनांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
आंदोलनाचे नियोजित टप्पे:
२४ जून २०२६ पर्यंत: मागण्यांवर तोडगा न निघाल्यास पुढील पावले उचलली जातील.
२५ जून २०२६: राज्यातील प्रत्येक आगार आणि युनिटमध्ये प्रशासनाविरोधात जाहीर निदर्शने केली जातील.
२६ जून २०२६: सर्व आगार, विभाग आणि मध्यवर्ती कार्यशाळांच्या प्रवेशद्वारांवर ‘द्वार सभा’ (Gate Meetings) घेऊन कर्मचाऱ्यांना जागृत केले जाईल.
२९ जून २०२६: या सर्व आंदोलनानंतरही निर्णय न झाल्यास २९ जूनपासून विभागीय कार्यालयांसमोर ‘बेमुदत धरणे आंदोलन’ सुरू करण्यात येईल.
प्रशासनावर जबाबदारी; परभणी जिल्ह्यात हालचाली वेगात
वसमत आगारात संयुक्त कृती समितीच्या वतीने हे आंदोलन केले जाणार असून, आंदोलनादरम्यान प्रवाशांची होणारी गैरसोय किंवा उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला पूर्णपणे रा.प. प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या आंदोलनाची पूर्वकल्पना म्हणून परभणीचे विभागीय नियंत्रक, वसमतचे तहसीलदार, स्थानिक पोलीस निरीक्षक आणि सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांना या निवेदनाच्या प्रती सादर करण्यात आल्या आहेत.
विविध संघटना एकत्र
एसटी कर्मचाऱ्यांच्या या लढ्यासाठी म.एस.टी. कामगार संघटना, म.एस.टी. कामगार सेना, कास्ट्राईब रा.प. कर्मचारी संघटना, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस आणि राष्ट्रीय मुळनिवासी रा.प. कर्मचारी संघटना या प्रमुख संघटनांचे पदाधिकारी व अध्यक्ष एकत्र आले असून, त्यांच्या संयुक्त स्वाक्षऱ्यांनी हे निवेदन प्रशासनाला सुपूर्द करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे आगामी काळात एसटी सेवा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



