वसमत तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळलेला नाही; सोशल मीडियावरील यादी खोटी-आ.राजुभैय्या नवघरे
रामु चव्हाण

वसमत तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळलेला नाही; सोशल मीडियावरील यादी खोटी
शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; आमदार राजू नवघरे यांचे आवाहन
वसमत | रामु चव्हाण
वसमत तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आल्याचा दावा करणारी यादी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. मात्र, ही यादी खोटी आणि दिशाभूल करणारी असून शेतकरी व नागरिकांनी तिच्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू भैया नवघरे यांनी केले आहे.
या संदर्भात कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अधिकृत माहिती मागवण्यात आली आहे. कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, वसमत विधानसभा मतदारसंघात यंदाच्या पावसाळ्यात वारंवार मोठे खंड पडले आहेत. जून महिन्यात जवळपास नऊ दिवस, जुलै महिन्यात नऊ दिवस, ऑगस्ट महिन्यात सात दिवस, तर २५ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत तब्बल १९ दिवस पावसाचा खंड नोंदवण्यात आला आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची तूट वसमत तालुक्यात
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात सर्वाधिक उणे ४५ टक्के पावसाची एकूण तूट नोंदवण्यात आली आहे. औंढा नागनाथ तालुक्यात उणे २६.३३ टक्के तूट नोंदवली गेल्याचेही कृषी विभागाच्या माहितीतून स्पष्ट होत असल्याचे आमदार नवघरे यांनी सांगितले.
पावसाच्या दीर्घ खंडामुळे वसमत तालुक्यातील सोयाबीन, कापूस, हळद आणि ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांतील पिके पूर्णत्वास जाण्याची शक्यता धूसर झाली असून शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन
“वसमत तालुक्याला कोणत्याही अधिकृत यादीतून वगळण्यात आलेले नाही. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अपुऱ्या, चुकीच्या अथवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. केवळ शासन आणि संबंधित विभागांकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा,” असे आवाहन आमदार नवघरे यांनी केले.
यापूर्वीही वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास ६० टक्के पीकविमा मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्य आणि अधिकृत माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवावी तसेच कोणत्याही अफवेला थारा देऊ नये, असेही आमदार राजू भैया नवघरे यांनी स्पष्ट केले.



