आपला जिल्हासामाजिक
बंधुप्रेमाला पारखे झालेल्या बहिणींसाठी ‘माहेर’ चे रक्षाबंधन उपक्रमाला बहीणींची दाद…
राम चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण
पीएसआय बालाजी किरवले यांच्या संकल्पनेतून ‘माहेर’ उपक्रमाचे यशस्वी आयोजन
बहिण भावाच्या पवित्र नात्याला रेशीमबंधाने अधिक घट्ट करणाऱ्या ‘रक्षाबंधन’ या सणाचे औचित्य साधून जालना येथील अंजानी फाऊंडेशनच्या वतीने भावाचे प्रेम न लाभलेल्या बहिणींसाठी ‘माहेर’ हा खास उपक्रम गुरुवारी ( दि. 31 ) राबविण्यात आला. यावेळी अंजानी फाऊंडेशनचे संस्थापक बालाजी किरवले, कॉंग्रेस सेवा दलाचे शेख इब्राहिम, दैनिक बदलता महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विनोद काळे, व्यवस्थापक शरद सोनटक्के यांनी बहिणींकडून राखी बांधून घेत त्यांना ‘माहेरची साडी’ भेट दिली.
जालना येथील अंजानी फाऊंडेशनच्या वतीने वयोवृद्ध नागरिकांना दत्तक घेणे, रस्त्यावरील मनोरुग्ण, अपंग, निराधार विधवा, गरजूंना, जीवनावश्यक वस्तू पुरविणे, दिवाळी उपक्रम, हिवाळी उपक्रम, पावसाळी उपक्रम, उन्हाळी उपक्रम तसेच ‘शिक्षण, आरोग्य आणि रोजगार’ या क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतात.
रक्षाबंधन सणानिमित्त बहीण आपल्या लाडक्या बंधुरायाला राखी बांधून बहीण भावाच्या पवित्र नात्याला अधिक बळकट करीत असते. मात्र, अनेक बहिणींना बंधुप्रेम लाभलेले नसते. अशा भाऊ नसलेल्या बहिणींना रक्षाबंधन सण आला की, आपल्याला पण भाऊ असता तर आपणही त्याला आनंदाने राखी बांधली असती, असा विचार त्यांच्या मनात येतोच. ही बाब लक्षात घेऊन अंजानी फाऊंडेशनचे संस्थापक बालाजी किरवले, अध्यक्षा ज्योती आडेकर, सचिव विद्या जाधव यांच्या संकल्पनेतून ‘माहेर’ हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. बंधुप्रेमाला पारखे झालेल्या अनेक बहिणींना माहेर हा उपक्रम बंधुप्रेम मिळवून देतो. दरम्यान गुरुवारी ( दि.31 ) हा उपक्रम जालना शहरातील संस्थेच्या कार्यालयात राबविण्यात आला. यावेळी अनेक बहिणींकडून राखी बांधून घेऊन त्यांच्या चेहर्यावर आनंद फुलविण्यात आला. प्रसंगी राखी बाधतांना भावाच्या आठवणीने काही बहीणींचे डोळे पाणावले तर काही बहीणींना आपले अश्रु आवरता आले नाही. आपल्याला सख्खा भाऊ नसला तरी रक्षणकर्ता भाऊ मिळाल्याचा आनंद झाल्याची चर्चा बहीणींमधुन होत आहे.
यावेळी अंजनी फाउंडेशनचे संस्थापक बालाजी किरवले, शेख इब्राहिम, प्रमुख पाहुणे सुनंदाताई निकरट पुणे यांच्यासह संस्थेच्या अध्यक्षा ज्योती आडेकर, सचिव विद्या जाधव, शेख महेजबीन यांची उपस्थिती होती. यावेळी 100 महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या अशी माहिती सचीव विद्या जाधव यांनी दिली.