अर्धापूर तालुक्यातील धामदरीच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री. रवींद्र चंद्रकांत जांभळे यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,शाखा नांदेड यांच्या वतीने देण्यात येणारा ‘जिल्हास्तरीय शिक्षक आयकॉन पुरस्कार 2022-23’ प्रदान करण्यात आला.
पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या रवींद्र जांभळे गुरुजीवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नांदेड शहरात असलेल्या कुसुम सभागृहात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा नांदेडच्या वतीने दिनांक 3 मे 2023 रोजी त्रैवार्षिक अधिवेशनादरम्यान जिल्हास्तरीय शिक्षक आयकॉन पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 46 शिक्षकांना माजी मंत्री डी.पी. सावंत,आ.बालाजी कल्याणकर आ.राजेश पवार,माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, शिक्षक संघाचे संभाजी थोरात तात्या आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आपल्या वडीलाकडून विद्येचे बाळकडू मिळालेले रवींद्र जांभळे हे, गेले वीस वर्षे अखंडपणे आपले ज्ञानदानाचे कार्य सुरू ठेवले आहे. सबंध जिल्ह्यात आदर्श तंत्रस्नेही शिक्षक म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे.
केवळ शिक्षक म्हणूनच नाही तर, समाजाप्रती असणाऱ्या तळमळीतून त्याने अनेक उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. गणित,इंग्रजी हे किचकट वाटणारे विषय त्यांनी खेळीमेळीने शिकवून विद्यार्थ्यांना त्यात रुची निर्माण केली. शालेय विषयांव्यतिरिक्त त्यांना संगीताची असलेली आवडही त्यांनी जोपासली व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला.
‘ओसाड उन्हाड जागा,तेथे होतील सुंदर बागा..’याचा ध्यास घेऊन त्यांनी सध्या कार्यरत असलेली धामदरी ची जिल्हा परिषद शाळा हरित शाळा करण्याचा संकल्प केला व गेली पाच वर्ष सतत प्रयत्न करून जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची हरित शाळा बनविण्यात ते यशस्वी झाले.
विद्यार्थ्यांनी रवींद्र जांभळे सरांना आदर्श मानले आहे. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे सन 2018-19 चा शिक्षण विभागातर्फे दिला जाणारा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व आता शिक्षक संघानेही त्यांच्या कार्यावर जिल्हास्तरीय शिक्षक आयकॉन पुरस्काराची मोहोर उमटवली. त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सर्वगुणसंपन्न असलेले रवींद्र जांभळे हे मूळचे विद्यानगर, वसमत जि. हिंगोली येथील रहिवासी आहेत. त्यांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे अर्धापूर तालुक्याच्या शिरपेच्यात एक मानाचा तुरा रोवला आहे. धामदरी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दशरथ कदम, मुख्याध्यापक बळीराम शिंदे, शिक्षक राम पतंगे, धम्मदीप जोंधळे व समस्त गावकरी यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून सरांचे कौतुक होत आहे.