मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्य सेवे बद्दल खासदार हेमंत पाटील नेहमीच धावून जातात. जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वाकोडी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी केवळ चार दिवसातच नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करुन देत रुग्णांची होणारी हेळसाड थांबली आहे. खासदार हेमंत पाटील यांनी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा केल्याने वाकोडीकरांच्या सेवेत तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध झाली असून, खासदार हेमंत पाटील यांच्या कार्यतत्पर्तेचा जनतेला पुन्हा एकदा अनुभव आला आहे.
जिल्ह्यातील कळमनुरी तालुका वाकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचा आरटीओ कालावधी संपल्याने मागील तीन महिन्यापासून रुग्णवाहिका सेवा बंद होती. प्राथमिक आरोग्य केंद्रास आजूबाजूच्या परिसरातील गावे जोडली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण तिथे उपचारासाठी येतात परंतू प्रसूती किंवा गंभीर रुग्णाना तातडीने जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी हलविण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना मोठी कसरत करावी लागत होती. रुग्णांच्या नातेवाईकांच्या खिशाला झळ बसत होती.
ही बाब स्थानिक नागरिकांनी खासदार हेमंत पाटील यांच्या कळमनुरी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयास कळविली. खासदार हेमंत पाटील यांनी तातडीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना वाकोडी प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबत चार दिवसापूर्वी लेखी निवेदन देऊन रुग्णवाहिकेची मागणी केली होती. आरोग्य विभागाने त्यांच्या पत्राचे तात्काळ दाखल घेत चारच दिवसात वाकोडीकरांच्या सेवेत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने गावकऱ्यांनी खासदार हेमंत पाटील यांचे आभार मानले.