वसमतमध्ये घुमला गोमातेचा जयघोष! ‘राज्यमाता–गोमाता संवाद यात्रे’चे अभूतपूर्व स्वागत; गोशाळांनी ‘गो-उद्यम’ मॉडेल स्वीकारावे – अध्यक्ष शेखरजी मुंदडा
संपादक हरनामसिंग चव्हाण

- वसमतमध्ये घुमला गोमातेचा जयघोष! ‘राज्यमाता–गोमाता संवाद यात्रे’चे अभूतपूर्व स्वागत; गोशाळांनी ‘गो-उद्यम’ मॉडेल स्वीकारावे – अध्यक्ष शेखरजी मुंदडा

वसमत CT NEWS
वसमत
महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘राज्यमाता–गोमाता संवाद यात्रा’ सोमवारी (दि. २९ जून) वसमत शहरात दाखल झाली. यावेळी वसमतकरांनी आणि गोसेवाप्रेमींनी या यात्रेचे अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वागत केले. माळवटा येथील बाफना ट्रेडर्स येथे शितल बाफना, राधेश्याम मंत्री, अभय जैन, अशोक अडकीने, संजीव बेंडके, राजू सिद्दिकी आणि लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडच्या वतीने यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले.
गाय-वासराची पायी दिंडी आणि भक्तिमय वातावरण
यात्रेच्या स्वागतानिमित्त वसमत शहरात गाय आणि वासरू यांची विशेष पायी दिंडी काढण्यात आली होती. भजन, हरिनामाचा गजर आणि गोमातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. हा भक्तीचा पूर सभामंडपापर्यंत पोहोचला, जिथे गोमातेची अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत आरती करण्यात आली.
दिग्गजांची मांदियाळी
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी सहकार मंत्री डॉ. जयप्रकाशजी मुंदडा हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून:
मा. श्री. शेखरजी मुंदडा (राज्यमंत्री दर्जा, अध्यक्ष – महाराष्ट्र गोसेवा आयोग)
डॉ. सुनील सुर्यवंशी व उद्धव नेरकर (सदस्य – महाराष्ट्र गोसेवा आयोग)
मुकुंद आण्णा शिंदे (वरिष्ठ संचालक – महा एनजीओ फेडरेशन)
नितीन चिलवंत (मुख्य सारथी – संवाद यात्रा)
सुनीता मनमोहन बाहेती (नगराध्यक्षा, वसमत)
शिवदास बोड्डेवार
सिताराम मॅनेवार आणि शिवाजी आल्डिंगे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सर्व पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
गोशाळांना आता ‘गो-उद्यम’ बनवावे लागेल: शेखरजी मुंदडा
उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा यांनी गोशाळांच्या आर्थिक स्वावलंबनावर मोठा भर दिला. ते म्हणाले:
“गोशाळा केवळ दानधर्मावर चालणाऱ्या संस्था राहू नयेत, तर त्या ‘गो-उद्यम’ म्हणून विकसित होणे ही काळाची गरज आहे. गोमूत्र, शेणखत, जैविक उत्पादने आणि पंचगव्य निर्मितीच्या माध्यमातून गोशाळा आत्मनिर्भर होऊ शकतात. गोसेवकांना शासनातर्फे प्रशिक्षण, विमा संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी आयोग कटिबद्ध आहे. गोवंश संवर्धन ही केवळ धार्मिक भावना नसून ती ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि सेंद्रिय शेतीला बळ देणारी एक मोठी लोकचळवळ आहे.”
अध्यक्षीय भाषणात डॉ. जयप्रकाशजी मुंदडा आणि नगराध्यक्षा सुनीता बाहेती यांनीही आपले विचार मांडून या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.
गोसेवकांचे विशेष परिश्रम
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडचे अध्यक्ष राजू सिद्दिकी, संजीवकुमार बेंडके, बाळासाहेब बेले, कल्याण कुरुंदकर, अशोकराव आडकिने यांच्यासह वसमतमधील तमाम गोसेवकांनी अहोरात्र परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन बाळासाहेब बेले यांनी केले. या संवाद यात्रेमुळे वसमत परिसरात गोवंश संवर्धनाची एक नवी चेतना निर्माण झाली आहे.



