हिंगोली, नांदेड यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा- खासदार हेमंत पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सरसकट नुकसान भरपाईची केली मागणी
हिंगोली : राम चव्हाण
हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या हिंगोली , नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्ट-रवरील खरीप पिके, सोयाबीन, कापूस, तूर यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणच्या शेतजमिनी खरडून गेल्या तर नदी-नाल्यांनाही मोठ्या प्रमाणावर पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करण्याची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन केली आहे .
यंदा पर्जन्यमान आणि पीकपरिस्थिती चांगली असताना सुद्धा मागील सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. यंदाच्या खरीप हंगामातील सप्टेंबर महिना शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक घातक ठरला असून पहिल्या आणि शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने खरिपाच्या सोयाबीन , मूग उडीद, तूर, कापूस, हळद या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . नदी नाल्याना आलेल्या पुरामुळे अनेक भागातील शेतजमिनी खरडून गेल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते . या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील यांनी संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिंगोली , सेनगाव, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ , आणि किनवट , माहूर, हदगाव , हिमायतनगर ,उमरखेड व महागाव तालुक्याचा दौरा करून अनेक गावांना भेटी देत प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी सततच्या नुकसानीने हवालदिल झालेल्या शेतकरी बांधवांना पिकांची नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिंगोली , नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे . शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहणाऱ्या खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी सुद्धा शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे सांगितले .