-माजी सभापती रामकिशन झुंझुरडे, यांच्या उपस्थित कृत्रीम साहित्याचे वाटप
वसमत / रामु चव्हाण
दिव्यांगत्व लाभलेल्या प्रत्येकास स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा अधिकार आहे. त्यासाठी समाजाने देखील दिव्यांग बांधवांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहणे गरजेचे आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेत दिवाळीपूर्वीच दिव्यांग बांधवांना कृत्रीम साहित्य वाटप करुन दिव्यांगांची दिवाळी साजरी करण्यासोबत दिव्यांगांच्या पंखांना बळकटी देण्याचे महत्वपूर्ण कार्य केल्याचे वक्तव्य माजी सभापती रामकिशन झुंझुरडे यांनी येथे केले.
खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने सामाजिक न्याय आधिकारिता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली आलिम्को (कानपुर), महात्मा गांधी सेवा संघ संचलित हिंगोली जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या एडीप योजने अंतर्गत हिंगोली लोकसभा मतदार संघातील दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम हात, कृत्रिम पाय, कॅलिपर, कॉस्मेटिक ग्रोव्हज अशी साधने वाटप अभियान शनिवारी (दि.१५) वसमत पंचायत समिती येथे पार पडले. दरम्यान तालुक्यातील ८५ दिव्यांग बांधवांना गरजेनुसार मान्यवरांच्या उपस्थितीत कृत्रीम साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी दिलीप चिलगर, अलिमको टिमचे प्रकल्प समन्वयक कृष्णा शिरसाट, सरजन भालेराव, सुभाष वर्मा, जिल्हा अपंग पूनर्वसन केंद्र समन्वयक दिपक गडदे, कनिष्ठ सहाय्यक एन. एस.एगडे, विस्तार अधिकारी डी.एल.कोकरे, खासदार हेमंत पाटील यांचे प्रतिनिधी चंक्रधर खराटे, जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित निवासी अस्थिव्यंग, मुकबधीर व मतिमंद विद्यालयाचे व्ही. एल. जाधव, जनक कदम, विजय कंधारकर, सचिन वांगीकर, शिवसांब मुखेडे, शिवरुद्र शिंदे, राजकुमार भालके, सोमनाथ बालके, गंगाप्रसाद सरकाळे यांची उपस्थिती होती.
खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारामुळेच दिवाळीपूर्वी आयुष्याची दिवाळी झाली अशा भावना उपस्थित दिव्यांग बांधवांनी व्यक्त करुन कृत्रीम साहित्य वाटप केल्या बद्दल मनापासून धन्यवाद दिले. यापूर्वी हिंगोली शहरातील ८३, औंढा नागनाथ येथील २४, कळमनुरी तालुक्यातील ३७, सेमनगाव ५६ दिव्यांग बांधवांना कृत्रीम साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.