स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी प्रचंड अभ्यास, जिद्द, चिकाटी व मेहनत आवश्यक आहे त्याचप्रमाणे कुठलेही ध्येय प्राप्त करण्यासाठी वेड लागणे गरजेचे असल्याचे मत उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
बहिर्जी स्मारक महाविद्यालयात करिअर गाइडन्स व प्लेसमेंट सेल तर्फे आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी विकास माने यांनी आपला जीवनप्रवास उलगडुन दाखवत प्रतिकुल परिस्थितीत यश कसे संपादन करायचे याचे पाठ विद्यार्थ्यांना शिकवले. महाविद्यालयातर्फे त्यांचा शाल , बुके व महाविद्यालयाचा वार्षिकांक देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात नांदेड येथील दोन्ही हाताने अपंग असलेले वैभव पईतवार यांनी एमपीएससी परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. आपल्या आयुष्याचा मागोवा घेत, विजेचा धक्का लागुन दोन्ही हात गमवावे लागले पण खचुन न जाता जिद्दीने शिक्षण पुर्ण केले. एम एस डब्लु पास होऊन सेट नेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे व आता एमपीएससीच्या माध्यमातून महसुल सहाय्यक म्हणुन मुंबई येथे रुजु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आयुष्यात कष्ट करा, अभ्यास करा,आत्मविश्वास वाढवा, यश तुमचेच आहे असे म्हणत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ मा मा जाधव यांनी केला . महाविद्यालयात सर्व शैक्षणिक साधने उपलब्ध असुन विद्यार्थ्यांनी याचा उपयोग करून स्पर्धा परीक्षांमध्ये महाविद्यालयाचे नाव पुढे न्यावे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संयोजक प्रा डॉ अनिल मुगुटकर यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ सोनाजी पतंगे व आभार प्रदर्शन डॉ सविता अवचार यांनी केले. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर संस्थेचे संचालक ऍड रामचंद्र बागल साहेब, उपप्राचार्य डॉ महेश स्वामी , आयक्युएसी समन्वयक डॉ कुमावत यांची उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.